छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी नव्या वंदे भारत एक्स्प्रेससाठी ‘ऑपरेशनल फिजिबिलिटी चेक’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:50 IST2025-08-19T16:41:50+5:302025-08-19T16:50:01+5:30
वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्यासाठी स्टेशनवर पीटलाइन आणि सिकलाइनचे काम हाती घेण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी नव्या वंदे भारत एक्स्प्रेससाठी ‘ऑपरेशनल फिजिबिलिटी चेक’
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या दृष्टीने ‘ऑपरेशनल फिजिबिलिटी चेक’ करण्यात यावे, असे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ‘ऑपरेशनल फिजिबिलिटी चेक’ झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याने रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
खा. डॉ. भागवत कराड यांनी ११ जुलै रोजी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात अश्विनी वैष्णव यांना एक पत्र पाठवले होते. त्यास एका पत्राद्वारे उत्तर देताना मंत्री वैष्णव यांनी यासंदर्भात ‘ऑपरेशनल फिजिबिलिटी चेक’ करण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच फिजिबिलिटी अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद केले आहे. या निर्णयामुळे शहरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.
पीटलाइनच्या कामाला गती
वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्यासाठी स्टेशनवर पीटलाइन आणि सिकलाइनचे काम हाती घेण्यात आले आहे. पीटलाइनची विद्युतीकरणाचे खांब उभे करण्याचे काम सुरु आहे. सध्याची पीटलाइन १६ बोगींची आहे. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस १६ बोगींची राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.