केवळ दिलासा देणारा भीजपाऊस
By Admin | Updated: July 24, 2014 00:22 IST2014-07-23T23:43:17+5:302014-07-24T00:22:42+5:30
परभणी : मंगळवारी रात्रीपासून जिल्ह्यात भीज स्वरुपाचा हलका पाऊस झाला. हा पाऊस समाधानकारक नसला तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला.
केवळ दिलासा देणारा भीजपाऊस
परभणी : मंगळवारी रात्रीपासून जिल्ह्यात भीज स्वरुपाचा हलका पाऊस झाला. हा पाऊस समाधानकारक नसला तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला. बुधवारीही दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून भुरभुर होती.
आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहत होते. परंतु पाऊस काही पडत नव्हता. मंगळवारी रात्री हलक्या पावसाला सुरुवात झाली. रात्रभर कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस झाला. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला असून, अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू अशी चारही नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली. काही भागात तर दुबार, तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
२२ जुलै रोजी रात्री भुरभुर पावसाला सुरुवात झाली. अत्यंत हलक्या स्वरुपाचा पाऊस रात्रभर होता. बुधवारी दुपारपर्यंतही भीजपाऊस झाला. हा पाऊस पेरणीयोग्य नसला तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे. पेरणी झालेल्या पिकांना तग धरण्याइतपत हा पाऊस झालेला आहे. रानाच्या बाहेर या पावसाचे पाणी वाहिले नाही. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मात्र मिळालेला आहे.
मानवतमध्ये भुरभुर
मानवत तालुक्यात मंगळवारी रात्रीपासूनच भुरभुर पाऊस झाला़ दिवसभरही हलकासा पाऊस पडला़ या तालुक्यामध्ये अजूनही वझूर खु़, वझूर बु़, थार वांगी, कुंभारी, हमदापूर, शेवडी, पार्डी, कोथळा, सोमठाणा, नरळद या भागात पेरण्या शिल्लक आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी योग्य मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे़
सेलू तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, सर्वसाधारण पाऊस झाला आहे़ जिंतूर तालुक्यात यावर्षी पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आहे़ यापूर्वी झालेल्या पावसावर तालुक्यात पेरण्या सुरू करण्यात आल्या़ मंगळवारी देखील इतर तालुक्यांच्या तुलनेत जिंतूर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे़ गंगाखेड तालुक्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला़ या तालुक्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे़ यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे़ पालम आणि पूर्णा या दोन्ही तालुक्यामध्ये रात्री रिमझिम पाऊस होता़ तर सकाळी एक-दोन तास पावसाची रिपरिप सुरू होती़
पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे़ राज्यामध्ये इतर भागात जोरदार वृष्टी होत असताना परभणी जिल्हा मात्र कोरडा आहे़ एकही मध्यम स्वरुपाचा पाऊस या जिल्ह्यात झालेला नाही़ पावसाच्या प्रतीक्षेत आजपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या रोखून धरल्या़ त्यामुळे अजूनही पावसाची आस शेतकऱ्यांना आहे़ (प्रतिनिधी)
केवळ ७ मिमी पाऊस
२२ जुलै रोजी रात्री जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असले तरी महसूल प्रशासनाकडे केवळ ६़९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ सेलू तालुक्यात सर्वाधिक ११़२६ मिमी तर त्या खालोखाल परभणी आणि जिंतूर या तालुक्यात १० मिमी पाऊस झाला़ पालम तालुक्यात सर्वात कमी २ मिमी पाऊस झाला़ पूर्णा तालुक्यात ६़८०, मानवत ७़३३, पाथरी ८, गंगाखेड ३ आणि सोनपेठ तालुक्यात ४ मिमी पाऊस झाला आहे़ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ९४़७६ मिमी पाऊस झाला़ सर्वाधिक सोनपेठ तालुक्यात १११ मिमी पाऊस आहे़
पेरण्या रखडल्या
जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत़ काही भागात अल्प पावसावर तर काही भागात धूळ- पेरणी करण्यात आली आहे़ त्यामुळे ३५ टक्के पेरण्या झाल्या आहेत़ यातही अनेक शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणी करावी लागली आहे़