‘ज्यांना ज्यांना ‘यांना’ संपवायचंय त्यांच्याविरुद्ध आॅनलाइनचं हत्यार उपसण्यात आलंय’; कॉंग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांची सरकारवर टीकेची झोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 20:11 IST2017-11-02T20:07:52+5:302017-11-02T20:11:11+5:30
ज्यांना ज्यांना संपवायचंय त्यांच्याविरुद्ध देवेंद्र फडणवीस सरकारनं ‘आॅनलाइनचं’ हत्यार उपसलं आहे आणि स्वत: मुख्यमंत्री वाक्यागणिक खोटं बोलून लोकांची सतत दिशाभूल करीत आहेत’ असा घणाघात घालत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी यासंदर्भात अनेक उदाहरणे पेश केली.

‘ज्यांना ज्यांना ‘यांना’ संपवायचंय त्यांच्याविरुद्ध आॅनलाइनचं हत्यार उपसण्यात आलंय’; कॉंग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांची सरकारवर टीकेची झोड
औरंगाबाद : ज्यांना ज्यांना संपवायचंय त्यांच्याविरुद्ध देवेंद्र फडणवीस सरकारनं ‘आॅनलाइनचं’ हत्यार उपसलं आहे आणि स्वत: मुख्यमंत्री वाक्यागणिक खोटं बोलून लोकांची सतत दिशाभूल करीत आहेत’ असा घणाघात घालत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी यासंदर्भात अनेक उदाहरणे पेश केली. शेतक-यांची कर्जमाफी हा त्याचा सर्वात मोठा पुरावा होय,असे ते म्हणाले. ते दुपारी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली तापडिया नाट्य मंदिरात शहर- जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे सामाजिक परिवर्तन अभियान मेळावा संपन्न झाला. त्यानंतर त्यांनी पत्रपरिषदेत फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली.
‘ त्या’ स्कूलमध्ये आम्हालाही जायला आवडेल
मुख्यमंत्री चांगली अॅक्टिंग करतात. खोटं बोलू शकतात. हे सगळं ते कुठं शिकले, त्या स्कूलमध्ये आम्हालाही जायला आवडेल, असे उद्गार यावेळी डॉ. वाघमारे यांनी काढले. सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळ विकासासाठी ३११ कोटी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले; परंतु यातील ११ रु. सुद्धा दिले गेले नाहीत. कर्जमाफीची योजना शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू करून यांनी अद्याप एकाही शेतकºयाला कर्जमाफी दिली नाही. हा शिवाजी महाराजांचा घोर अपमान होय. आता त्यांनी शिवाजी महाराजांची आणि जनतेची फसवणूक केल्याबद्दल हात जोडून माफी मागितली पाहिजे, अशी तिखट प्रतिक्रिया राजू वाघमारे यांनी व्यक्त केली.
कर्जमाफी आॅनलाइन, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आॅनलाइन, पेपर तपासणी आॅनलाइन यात एक मोेठा घोटाळा दिसून येतो. तसेच या आॅनलाइनचा फटका शेतकरी, विद्यार्थी,युवक यांना बसून ते उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. या महत्त्वपूर्ण घटकांना आॅनलाइनचा काहीही फायदा झालेला नाही, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदींच्या चालीने देवेंद्र फडणवीस वागताहेत. स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी योजनांच्या व्याख्या बदलताहेत. सरकारच्या फसवेगिरीविरुद्ध काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरतो आहे,जनआक्रोश मेळावे घेत आहोत. ८ नोव्हेंबरला काळा दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. या पत्रपरिषदेस शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार, शहर जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष बाबाभाऊ तायडे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सुनीता तायडे-निंबाळकर, डॉ. पवन डोंगरे आदींची उपस्थिती होती.