ऑनलाइनचा पराक्रम; कार बक्षीस लागल्याची थाप मारून माजी सैनिकाला पावणेसहा लाखाला गंडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:20 IST2020-11-27T19:20:06+5:302020-11-27T19:20:28+5:30

कार मिळविण्यासाठी कराची रक्कम भरावी लागेल, अशी थाप मारली

The online fraud ; The ex-serviceman was fined Rs 5.7 lacks | ऑनलाइनचा पराक्रम; कार बक्षीस लागल्याची थाप मारून माजी सैनिकाला पावणेसहा लाखाला गंडवले

ऑनलाइनचा पराक्रम; कार बक्षीस लागल्याची थाप मारून माजी सैनिकाला पावणेसहा लाखाला गंडवले

ठळक मुद्दे फोन पे द्वारे व आपल्या बँक खात्यावरून बँक खात्यावर वेळोवेळी पैसे भरले.

वाळूज महानगर :  स्नॅपडीलवरून ऑनलाईन खरेदी केल्यानंतर कार बक्षीस लागल्याची थाप मारून एका सेवानिवृत्त माजी सैनिकाला पावणेसहा लाखांना गंडा घातल्याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेगराज मनराम सैनी (६५, रा. प्लॉट नंबर ८१०, सिडको वाळूज महानगर- १) असे फसवणूक झालेल्या माजी सैनिकांचे  नाव आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, बेगराज सैनी यांनी सप्टेंबर महिन्यात स्नॅपडीलवरून काही घरगुती वस्तू ऑनलाईन पद्धतीने खरेदी केल्या होत्या. २६ सप्टेंबर रोजी अलोककुमार सिंग याने सैनी यांच्या मोबाइलवर संपर्क साधून मी स्नॅपडील कंपनीचा प्रतिनिधी बोलत असून तुम्ही ऑनलाइन खरेदी केल्याने तुम्हाला कार बक्षीस लागली आहे, अशी थाप मारली. कार मिळविण्यासाठी कराची रक्कम भरावी लागेल, असे सांगितले होते. 

कार बक्षीस लागल्याने आनंदित झालेल्या सैनी यांनी टॅक्सची रक्कम भरण्यास सहमती दर्शवली. यानंतर सैनी यांनी फोन पे द्वारे व आपल्या बँक खात्यावरून अलोक कुमार यांच्या बँक खात्यावर वेळोवेळी पैसे भरले. मात्र, अलोककुमार हा पुन्हा पैशांची मागणी करीत असल्याने व कार देत नसल्याने सैनी यांना आपली फसवणूक झाल्याचा अंदाज आला. दरम्यानच्या कालावधीत सैनी यांनी कारच्या आमिषाने जवळपास ५ लाख ७० हजार ५०० रुपये अलोककुमार यांच्या खात्यात जमा केले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर बेगराज सैनी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांची भेट घेऊन आपबीती कथन केली. याप्रकरणी आरोपी अलोककुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावंत करीत आहेत.

Web Title: The online fraud ; The ex-serviceman was fined Rs 5.7 lacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.