कांद्याचे पीक बहरले
By | Updated: December 6, 2020 04:04 IST2020-12-06T04:04:28+5:302020-12-06T04:04:28+5:30
घाटनांद्रा : यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेरी हडोळ पाझर तलाव तुडुंब भरला असून, विहिरींसह जमिनीतील पाणी पातळीत ...

कांद्याचे पीक बहरले
घाटनांद्रा : यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेरी हडोळ पाझर तलाव तुडुंब भरला असून, विहिरींसह जमिनीतील पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे गहू, हरभरा या पिकांबरोबरच यंदा गावरान कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. मुबलक पाणीसाठ्यामुळे कांद्याचे पीकही चांगलेच बहरले आहे. कांदा हे सर्वात जास्त पाण्याचे पीक म्हणून ओळखले जाते. यंदा या परिसरात पाणी मुबलक प्रमाण आहे. दरवर्षी बाजारपेठेत कांद्याला भावही चांगला असल्याने व उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी गावरान कांद्याला पसंती दिली आहे. पाणी असल्यामुळे लागवड केलेले काद्यांचे पीक सध्या बहरत आहे.
येथील अमोल चौधरी, कारभारी मोरे, गणेश मालोदे या शेतकऱ्यांनी दोन एकर शेतजमिनीवर एकरी तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे कांदा बी खरेदी करून त्याची लागवड शेतशिवारात केली आहे. खरिपातील कांद्याने यंदा शेतकऱ्यांना दगा दिला होता. बुरशीजन्य आजारामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. कांद्याची पातही वाढीस लागली नाही. एकरी फक्त चार ते पाच क्विंटल उत्पादन निघाल्यामुळे त्यातून लागवडीचा खर्चदेखील निघाला नाही. कपाशी, मका, सोयाबीन या पिकांचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले. खरिपातील कसर रबीत काढण्यासाठी शेतकरी यंदा कांदा लागवडीकडे वळले आहेत. कांदा हे नगदी पीक असल्याने परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचा कांद्याचे पीक घेण्याकडे कल आहे.
घाटनांद्रा परिसरात शेतकऱ्यांनी लागवड केलेले कांद्याचे पीक बहरात आले आहे. (छायाचित्र दत्ता जोशी).