कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीला मुदतवाढ ही मराठा समाजासाठी संजीवनी: मनोज जरांगे
By बापू सोळुंके | Updated: January 31, 2025 19:25 IST2025-01-31T19:24:42+5:302025-01-31T19:25:13+5:30
मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करा

कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीला मुदतवाढ ही मराठा समाजासाठी संजीवनी: मनोज जरांगे
छत्रपती संभाजीनगर: कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ देण्याचे आश्वासन राज्यसरकारने दिले आहे. हा निर्णय मराठा समाजासाठी संजीवनी आहे, असे मत मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी आंतरवाली सराटी येथे पाच दिवसांचे उपोषण सोडल्यानंतर गुरूवारी रात्री मनोज जरांगे पाटील हे शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सगे सोयऱ्याची अंमलबजावणी ही कायदेशीर आहे, अन्यथा सरकारने यावर हरकती मागविल्या नसत्या. मराठा हा तीन वेळा मागास सिध्द झालेला आहे, व्यवसाय सरसकट प्रमाणपत्र देणे कायद्याने बरोबर आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करा अशी मागणीही त्यांनी केली.
याला गुंडगिरीला प्रोत्साहन देणे म्हणतात...
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड असल्याचे महंत नामदेश शास्त्री यांनी नमूद केल्याकडे मनोज जरांगे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, ते एक मोठे महंत आहेत. मला वाटत नाही ते बोलले असतील. काहीतरी गफलत असेल, ते जर असे बोलले असतील तर राज्याचे मोठे दुर्दैव आहे. याला गुंड गिरीला प्रोत्साहन देणे ,असे म्हणतात अशा शब्दात जरांगे पाटील यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्यावर टीका केली. गुन्हे करणारे सगळे गुंतणार आहेत, मात्र महंताजवळ जाऊन पाप लपणार नाही,'गडा'ने कोणालाही पाठीशी घालू शकत नाही,असे त्यांनी नमूद केले.