एकाला हवी विजयाची हॅट्ट्रिक, तर दुसऱ्याला नको!
By Admin | Updated: September 28, 2014 01:03 IST2014-09-28T00:36:18+5:302014-09-28T01:03:13+5:30
औरंगाबाद : फुलंब्री मतदारसंघातही प्रमुख उमेदवारांचे राजकीय समीकरण बदलले आहे.

एकाला हवी विजयाची हॅट्ट्रिक, तर दुसऱ्याला नको!
औरंगाबाद : सेना-भाजपा युती आणि काँग्रेस आघाडी तुटल्याने फुलंब्री मतदारसंघातही प्रमुख उमेदवारांचे राजकीय समीकरण बदलले आहे. आता जातीय समीकरणांना अधिक महत्त्व आले असून, विद्यमान आमदार डॉ. कल्याण काळे यांना तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्ट्रिक साधायची आहे. तर भाजपाचे उमेदवार आणि माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांना पराभवाची हॅट्ट्रिक टाळायची
आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या फुलंब्री मतदारसंघात मागील दहा वर्षांपासून डॉ. कल्याण काळे निवडून येत आहेत. त्यापूर्वी भाजपाचे हरिभाऊ बागडे निवडून आले होते. २० वर्षांपूर्वी या मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे निवडून आले होते. मतदारसंघाचा इतिहास काँग्रेसच्या बाजूने असला तरी यंदा राजकीय समीकरणे बरीच विचित्र होऊन बसली आहेत. मतदारसंघात एकूण २ लाख ८१ हजार मतदार आहेत.
मतदारसंघात मनसेचे भास्कर गाडेकर, सेनेचे राजेंद्र ठोबरे, राष्ट्रवादीच्या अनुराधा चव्हाण यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. याशिवाय आणखी २५ उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत. प्रमुख उमेदवारांमध्ये फुलंब्री तालुक्याचे तीन जण आहेत. त्यात गाडेकर, ठोंबरे आणि चव्हाण यांचा समावेश
आहे.
औरंगाबाद तालुक्यातील काळे आणि बागडे आहेत. मागील वेळी १६ हजार मते मिळविणारे सुहास शिरसाट भाजपामध्ये आल्याने हरिभाऊ बागडे थोडेसे समाधानी आहेत.
एकीकडे विकासकामांचा पाढाच डॉ. कल्याण काळे वाचत आहेत. तर दुसरीकडे तालुक्यातील खराब रस्ते भाजपाने ‘कळी’चा मुद्दा बनविला आहे. उमेदवारांची संख्या वाढल्याने सध्या मतदारसंघात कार्यकर्त्यांची दिवाळी ‘जोरदार’होणार आहे, हे निश्चित आहे.
मतदारसंघातील जाणकार मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार येथे १ लाख १७ हजार मराठा मतदार आहेत. ३२ हजार मुस्लिम, २७ हजार दलित बांधव, ११ हजार माळी, १२ हजार धनगर, ६ हजार वंजारी बांधव, ८ हजार राजपूत बांधव आहेत.
मतदारसंघात एकूण ५० जाती आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस दलित आणि मुस्लिम बांधवांना कितपत आपल्याकडे वळवू शकते यावर बरीच काही गणिते अवलंबून आहेत.