एक विभाग इकडे तर दुसरा विभाग तिकडे; छत्रपती संभाजीनगरची जिल्हा परिषद विस्कळीत
By स. सो. खंडाळकर | Updated: September 4, 2025 19:55 IST2025-09-04T19:55:14+5:302025-09-04T19:55:30+5:30
कामानिमित्त आलेल्यांना कोणता विभाग कुठे आहे, याचा शोध घेत फिरावे लागत आहे.

एक विभाग इकडे तर दुसरा विभाग तिकडे; छत्रपती संभाजीनगरची जिल्हा परिषद विस्कळीत
छत्रपती संभाजीनगर : औरंगपुरा येथील मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारे जि.प.चे कार्यालय नव्या इमारतीच्या बांधकामापासून विस्कळीत झाले आहे. जिल्हा परिषदेंतर्गत चालणारे विविध विभाग एक इकडे तर एक तिकडे आहे. त्यामुळे या मिनी मंत्रालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मात्र पुरती गैरसोय होत आहे.
दरम्यान, नवी इमारत बांधून पूर्ण झाली. पण, इमारतीतील विद्युत पुरवठा, फर्निचर व अन्य कामे प्रलंबित आहेत. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध नाही. तो जेव्हा केला जाईल, तेव्हाच ही कामे हाती घेतली जातील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सारे विभाग या नव्या विभागात कधी कार्यरत होतील, हे सांगणे अशक्य आहे. तोपर्यंत विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना अनेक गैरसोयींना सामाेरे जावे लागणार, हे उघड आहे. त्यात त्यांचा वेळ व पैसा वाया जाणार आहे. शिवाय विभाग एकाच छताखाली नसल्याने त्यावर नियंत्रण ठेवणेे देखील अवघड जात आहे.
कुठला विभाग कुठे?
१) आरोग्य विभाग : आरोग्य उपसंचालक कार्यालय, बाबा पंप
२) शिक्षण विभाग माध्यमिक व प्राथमिक : चेलीपुरा हायस्कूल, स्टेशन रोड
३) पंचायत विभाग : डीआरडीए टाईप निवासस्थान-अ-८, अ-९ पानचक्की रोड
४) समाजकल्याण विभाग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा
५) पशुसंवर्धन विभाग : डीआरडीएच्या बाजूला, घाटी हॉस्पिटलसमोर
६) कृषी विभाग : सामाजिक न्याय विभाग, खोकडपुरा
७) पाणीपुरवठा विभाग : जिल्हा परिषद कन्या प्रशाला इमारतीच्या बाजूला
८) यांत्रिकी विभाग : जि.प. कन्या प्रशाला, औरंगपुरा
९) स्वच्छ भारत मिशन : नारळीबाग
१०) वेतन, वेतन पडताळणी व गट विमा योजना : नारळीबाग निवासस्थान
११) महिला व बालकल्याण, सीईओंचे दालन, डेप्युटी सीईओंचे दालन, वित्त विभाग, बांधकाम विभाग, सिंचन विभाग, अध्यक्ष, उपाध्यक्ष व विविध समित्यांचे दालन हे जि.प.तच आहेत.
यामुळे कामानिमित्त आलेल्यांना कोणता विभाग कुठे आहे, याचा शोध घेत फिरावे लागत आहे.