एक घर, तीनदा मालमत्ता कर! छत्रपती संभाजीनगरात १८ हजारांहून अधिक मालमत्ताधारक त्रस्त

By मुजीब देवणीकर | Updated: February 8, 2025 19:53 IST2025-02-08T19:52:53+5:302025-02-08T19:53:39+5:30

‘माल’मत्ता करात अडचणी: छत्रपती संभाजीनगरात मालमत्ता करासंदर्भात तुम्हालाही अशाच पद्धतीचा अनुभव, त्रास असेल तर आम्हाला कळवा. आमच्या ९८५०३८४३९५ या मोबाइल क्रमांकावर व्हॉटसॲपच्या माध्यमाने सविस्तर माहिती पाठवा.

One house, three times the property tax! More than 18 thousand property owners in Chhatrapati Sambhajinagar are suffering | एक घर, तीनदा मालमत्ता कर! छत्रपती संभाजीनगरात १८ हजारांहून अधिक मालमत्ताधारक त्रस्त

एक घर, तीनदा मालमत्ता कर! छत्रपती संभाजीनगरात १८ हजारांहून अधिक मालमत्ताधारक त्रस्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील २ लाख ८२ हजार मालमत्तांची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. त्यातील १८ हजार मालमत्तांना दोन ते तीन वेळेस कर लावण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून मालमत्ताधारक महापालिकेच्या विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. एक घर एकच टॅक्स लावा म्हणून थकले, तरी प्रशासन चुकीच्या कराची नोंद रद्द करायला तयार नाही.

कर प्रणालीत सुसूत्रता यावी म्हणून जवळपास ३० कोटी रुपये खर्च करून सॉफ्टवेअर घेतले. स्मार्ट सिटीच्या एका एजन्सीला काम दिले. त्यानंतरही कर प्रणालीत सुधारणा झालेली नाही. एका मालमत्ताधारकाला तीन वेगवेगळे कर भरा म्हणून नोटिसा येतात. अनेक जण तीनपैकी एकच कर भरतात. उर्वरित दोन कर भरत नाहीत. ही थकबाकी वाढत जाते. त्यावर चक्रवाढ पद्धतीने दरवर्षी २४ टक्के व्याजही लावण्यात येते. लाखो रुपयांची ही थकबाकी भरा म्हणून नोटिसाही देण्यात आल्या. वॉर्ड कार्यालये, मनपा मुख्यालयात अनेक मालमत्ताधारकांनी लेखी स्वरूपात तक्रारी केल्या. एक घर एकच कर करून द्या, अशी मागणी केली. अशा अर्जांना संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी चक्क केराची टोपली दाखवतात. कारण हे काम करून दिले तर मालमत्ताधारक ‘माल’ देणार नाही, म्हणून अशी प्रकरणे प्रलंबित असतात, अशी चर्चा मालमत्ताधारकांमध्ये आहे.

कर समाधान शिबिर
मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी कर समाधान शिबिर घेण्यास सुरुवात केली. शिबिरात जेवढे अर्ज येतात, त्यातील किती जणांचे समाधान होते, हे नंतर तपासले पाहिजे. जागेवर जेवढे अर्ज निकाली निघाले, तेवढ्याचेच समाधान होते.

मालमत्ता दुसऱ्यांची, कर तिसऱ्याच्या नावे
जुन्या शहरात जी मालमत्ता आपली नाही, त्या मालमत्तेवरही तिसऱ्या व्यक्तीचे नाव लावून मनपा माेकळी झाली. तपासणी करून हे नाव कमी करून द्या, असे अर्ज केले तरी त्याची दखल संबंधित वॉर्ड कार्यालय घेत नाही. थकबाकीची नोटीस प्रामाणिकपणे आणून दिली जाते.

तुमचीही तक्रार असेल तर...
मालमत्ता करासंदर्भात तुम्हालाही अशाच पद्धतीचा अनुभव, त्रास असेल तर आम्हाला कळवा. आमच्या ९८५०३८४३९५ या मोबाइल क्रमांकावर व्हॉटसॲपच्या माध्यमाने सविस्तर माहिती पाठवा.
-संपादक

Web Title: One house, three times the property tax! More than 18 thousand property owners in Chhatrapati Sambhajinagar are suffering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.