आधार कार्डवर एक तर जन्म प्रमाणपत्रावर दुसरीच जन्मतारीख; फसवणाऱ्या २९ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:34 IST2025-11-21T19:33:29+5:302025-11-21T19:34:34+5:30
विलंबाने जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी घोटाळा, शहरातील २९ जणांवर गुन्हे दाखल

आधार कार्डवर एक तर जन्म प्रमाणपत्रावर दुसरीच जन्मतारीख; फसवणाऱ्या २९ जणांवर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर :आधार कार्डवर एक तर जन्म प्रमाणपत्रावर दुसरीच जन्मतारीख दाखवत शासनाला अनेकांनी गंडा घालत जन्म प्रमाणपत्र मिळवले. शिवाय वाटेल त्या जन्मस्थळाचा उल्लेख करून विलंबाचे जन्म प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी शहरातील २९ जणांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यांच्यापूर्वी रामेश्वर रोडगे त्यांच्या पदावर कार्यरत होते. काही महिन्यांपासून राज्यभरात बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचे घोटाळे उघडकीस येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गंभीर आरोप प्रशासनावर झाले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचनेवरून राठोड यांनी विलंबाने प्राप्त जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचे पुनर्निरीक्षण करण्यास सुरुवात केली होती. यात प्राथमिक तपासात २९ जणांनी विलंबाने जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जासोबत खोटे पुरावे, ज्यात जाणीवपूर्वक खोट्या जन्म तारखा, खोटे जन्मस्थळ, खोटे शपथपत्र देत जन्माचे सर्वच बनावट दाखले सादर केले. त्या आधारे ग्रामपंचायत, महापालिकांमधून जन्म प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केली.
आरोपी वाढण्याची शक्यता
अशाप्रकारे सर्वच खोटी कागदपत्रे जोडून शेकडो जणांनी बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळवले आहे. यात आणखी आरोपी निष्पन्न होणार असून, तफावत असलेल्या कागदपत्रांची चौकशी सुरू असल्याचे राठोड यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.