यंदाच्या जयंतीवर ‘डिजिटायजेशन’ची छाप,बाबासाहेबांवरील श्रद्धेपोटी बेधुंद होऊन थिरकली तरुणाई

By विजय सरवदे | Published: April 15, 2024 12:37 PM2024-04-15T12:37:17+5:302024-04-15T12:40:39+5:30

रेकॉर्ड ब्रेक गर्दी! क्रांतीचौक ते सिटीचौकापर्यंत मुंगीलाही पाय ठेवायला जागा नव्हती. तरीही मिरवणूक पुढे- पुढे सरकत होती.

On this year's Babasaheb Ambedkar Jayanti, the impression of 'digitization', the youth was overwhelmed by faith in Babasaheb | यंदाच्या जयंतीवर ‘डिजिटायजेशन’ची छाप,बाबासाहेबांवरील श्रद्धेपोटी बेधुंद होऊन थिरकली तरुणाई

यंदाच्या जयंतीवर ‘डिजिटायजेशन’ची छाप,बाबासाहेबांवरील श्रद्धेपोटी बेधुंद होऊन थिरकली तरुणाई

छत्रपती संभाजीनगर : भीमजयंतीनिमित्त रविवारी रात्री मुख्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या लाखो अनुयायांंच्या गर्दीने आजपर्यंतचे सारेच रेकॉर्ड ब्रेक केले. क्रांतीचौक ते सिटीचौकापर्यंत मुंगीलाही पाय ठेवायला जागा नव्हती. तरीही मिरवणूक पुढे- पुढे सरकत होती. ‘हँगिंग डीजे’ आणि ‘लेझर शो’च्या ठिकाणी भीमगीतांवर तरुण- तरुणीच नव्हे, तर लहान मुले, महिला-पुरुषही थिरकले. एकंदरीत हा अमाप उत्साह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या श्रद्धेचा अन् आदराचा दाखलाही देऊन गेला.

दिवसभर आग ओकणारा सूर्य थोडा शांत झाल्यावर सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्य मिरवणूक सुरू झाली. तरीही मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी वस्त्यावस्त्यांमधून येणाऱ्या वाहनांचा ओघ रात्री ९ वाजेनंतर वाढला. मात्र, सायंकाळी ६.३० वाजेपासूनच क्रांतीचौक, पैठण गेट, गुलमंडी, सिटीचौकमार्गे भडकल गेट हा मार्ग आंबेडकरी अनुयायांच्या गर्दीने फुलून गेला होता. मिरवणुकीचा उत्साह डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी घराघरांतील अख्खे कुटुंब बच्चेकंपनीसह रस्त्यावर होते. रात्री उशिरापर्यंत बाबासाहेबांच्या जयघोषाने संपूर्ण आसमंत निनादून गेला होता. क्रांतीचौक ते सिटीचौकापर्यंत संदीप आढाव मित्रमंडळ, माता रमाई स्मारक समिती, पँथर्स रिपब्लिकन पार्टी, परिवर्तनवादी चळवळ, लॉर्ड बुद्धा मित्रमंडळ, युवासेना मंडप कामगार संघटना, पोलिस बॉइज, भीमकायदा सामाजिक संघटना, वंचित बहुजन आघाडी, आंबेडकरवादी संघर्ष समिती आदींसह विविध पक्ष, संघटना, मित्रमंडळांच्या व्यासपीठांवर मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले जात होते.

वकिलाच्या वेशभूषेतील आंबेडकर
या मिरवणुकीत बाळासाहेब गायकवाड यांच्या ‘साहेब प्रतिष्ठान’ ढोल पथकाने लक्षवेधी कवायती सादर केल्या. त्यांची सर्वोच्च न्यायालयातील डॉ. आंबेडकरांची वकिलाच्या वेशभूषेतील पुतळ्याची हुबेहूब प्रतिकृती या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरली. त्यापाठोपाठ पैठण गेटवर येथे नागसेन मित्रमंडळाने उभारलेला ‘राजगृहातील पुस्तकालयात वाचनामध्ये गढून गेलेले डॉ. आंबेडकर’ हा थ्री-डी देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. संदीप शिरसाट मित्रमंडळाचा देखावाही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या मंडळाने ‘लंडन येथील शिक्षण अर्धवट सोडून बाबासाहेब कैसर-ए-हिंद या बोटीने भारतात आले’ हा देखावा सादर केला होता. जयंती उत्सव महासमितीचे अध्यक्ष राम पेरकर, मिलिंद दाभाडे, गौतम खरात, गौतम लांडगे, संतोष भिंगारे, तर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीचे नवीनसिंग ओबेरॉय, बाबूराव कदम, नागराज गायकवाड, शेख शफी हे मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.

पोलिसांची जागोजागी टेहळणी
यंदा मिरवणुकीत गडबड- गोंधळ होऊ नये, यासाठी क्रांतीचौक, सिल्लेखाना चौक, पैठण गेट, औरंगपुरा, अशा विविध ठिकाणी उंच टॉवर उभारून टेहळणी केली. याशिवाय मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात साध्या वेशातील महिला- पुरुष पोलिस लक्ष ठेवून होते.

‘लेझर शो’ आणि थिरकणारी तरुणाई
सिल्लेखाना चौकात अरुण बोरडे मित्रमंडळाचा, तर समोर राजू साबळे मित्रमंडळाचा ‘लेझर शो’ आणि ‘डीजे’ तरुणाईसाठी थिरकण्याचा ‘पॉइंट’ ठरला. त्याठिकाणी भीमगीतांच्या तालावर बच्चेकंपनींसह युवक- युवती, पुरुष- महिलांनी ठेका धरला होता. गाण्यांच्या तालावर थिरकणाऱ्यांचे क्षण मोबाइलमध्ये टिपण्यासाठी जणू स्पर्धाच सुरू होती.

Web Title: On this year's Babasaheb Ambedkar Jayanti, the impression of 'digitization', the youth was overwhelmed by faith in Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.