पहिल्या दिवशी ४३७ ज्येष्ठांची ‘लालपरी’तून मोफत सफर
By संतोष हिरेमठ | Updated: August 27, 2022 19:48 IST2022-08-27T19:47:48+5:302022-08-27T19:48:25+5:30
कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे.

पहिल्या दिवशी ४३७ ज्येष्ठांची ‘लालपरी’तून मोफत सफर
औरंगाबाद : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेला शुक्रवापासून सुरुवात झाली. एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातून शुक्रवारी पहिल्या दिवशी ७५ वर्षांवरील ४३७ ज्येष्ठांनी लालपरी म्हणजे एसटी बसमधून मोफत प्रवास केला.
राज्य शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा केली. या योजनेचा बुधवारी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान शुभारंभ झाल्यानंतर एसटी महामंडळ प्रशासनाने परिपत्रक जारी केले आहे. प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे. सदर सवलत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत असेल. दरम्यान, २६ ऑगस्टपूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या नागरीकांना तिकिटाचा परतावा दिला जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळातर्फे देण्यात आली.
पहिल्या दिवशी प्रवास करणारे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ
आगार- प्रवासी संख्या
सिडको बसस्थानक-२१
मध्यवर्ती बसस्थानक-६७
पैठण-८९
सिल्लोड-५९
वैजापूर-३८
कन्नड-७६
गंगापूर-८६
सोयगाव-१