एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे लग्नसराई; फुलांच्या किमतीत दुपटीने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:10 IST2025-05-03T13:07:03+5:302025-05-03T13:10:01+5:30
ऐन लग्नसराई आणि सणासुदीच्या काळातच फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकही त्रस्त झाले आहेत.

एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे लग्नसराई; फुलांच्या किमतीत दुपटीने वाढ
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे लग्नसराई यामुळे फुलांच्या किमती दुपटीने वाढलेल्या दिसून येत आहेत. बाजारात आधी ७० ते ८० रुपयांना मिळणारा गुलाब आता दीडशे रुपयांवर पोहोचलाय, तर निशिगंध, जिप्सी, जरबेरा, शेवंती या फुलांच्या किमतीही सध्या दुपटीने वाढल्या आहेत.
ऐन लग्नसराई आणि सणासुदीच्या काळातच फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकही त्रस्त झाले आहेत. फुलाच्या बागांना जास्त पाणी लागते. सध्या उन्हाची वाढलेली तीव्रता पाहता फुलबागांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे शहरातील मुकुंदवाडी, गुलमंडी, पैठणगेट येथील बाजारात फुलांची आवक कमी झालेली आहे.
मुकुंदवाडीतील बाजारात यापूर्वी ३० रुपयांना मिळणारा झेंडूच्या फुलांचा हार आता ५० रुपयांना विकला जातोय. फूल विक्रेते शकील पठाण म्हणाले, पूर्वी एका दिवसाला ३० ते ४० पर्यंत फुलांचे हार विकले जात होते. सध्या केवळ १५ ते २० हार विकले जात आहेत. तसेच, उन्हामुळे फुले, हार खराब होत आहेत. आम्हाला नुकसान सोसावे लागत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
फुलांचे नाव व सध्याचे दर
गुलाब- पूर्वी ७० ते ८० रुपये आता १५० रुपये
निशिगंध- पूर्वी १५० रुपये आता ३०० रुपये
जिप्सी- पू्र्वी १५० रुपये आता ४०० रुपये
जरबेरा- पूर्वी ४० रुपये आता ८० रुपये
शेवंती- पूर्वी २०० रुपये आता ३५० रुपये
हात आखडता घेतला
उन्हामुळे फुलांच्या विक्रिवर २० ते ३० टक्क्यांपर्यंत परिणाम झाला आहे. फुलांचे हार जयंत्या, विशेष कार्यक्रम, सणावारांसाठी खरेदी होत आहे. मात्र, दर दुप्पट झाल्यामुळे सामान्य नागरिकांकडून फुलांची खरेदी करताना हात आखडता घेतला जात आहे. कार्यक्रम, लग्नात मागणी कायम आहे.
-रतन जाणा
दिल्लीवरून आले हायड्रेंजिया
कॅननोट प्लेस येथील एका फुलांच्या दुकानात सध्या हायड्रेंजिया आणि लिलियम ही दुर्मीळ फुले पाहायला मिळत आहेत. ही दोन्ही प्रकारची फुले खास दिल्लीवरून मागवण्यात आली आहेत. शहरातील एका विशेष कार्यक्रमात सजावटीसाठी या फुलांची मागणी करण्यात आली होती. हायड्रेंजिया या एका फुलाच्या गुच्छाची किंमत ही ८०० रुपये आहे, तर जांभळ्या लिलियमची किंमत १२०० आहे.