छत्रपती संभाजीनगर : शहरात बार, वाइन शॉप बंद असताना मद्यधुंद रिक्षाचालकाने मोबाइल टॉवरवर चढत पोलिसांसह अग्निशमन विभागाला तीन तास वेठीस धरले. सोमवारी दुपारी ३ ते ६ दरम्यान बेगमपुऱ्यातील डी.के.एम.एम महाविद्यालयासमोर ही घटना घडली.
विजय रामराव भोईर (५३) असे रिक्षाचालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३ वाजेच्या सुमारास सदर चालक महाविद्यालयासमोरील टॉवरजवळ बराच वेळ घुटमळत होता. नंतर त्याने टॉवरवर चढण्यास सुरुवात केली. स्थानिकांनी आरडाओरड करून त्याला खाली येण्यास सांगितले. मात्र, भोईर खाली येण्याच्या मनस्थितीत नव्हता.
घटनेची माहिती कळताच दामिनी पथकाने जात गर्दीला बाजूला केले. त्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी धाव घेतली. अग्निशमन अधिकारी विजय राठोड, अशोक खांडेकर यांनी जवानांसह धाव घेत त्याला सुरक्षित खाली उतरवले. भोईर यांना ताब्यात घेत घाटी रुग्णालयात नेऊन तपासणी करण्यात आली. त्यात तो मद्याच्या अमलाखाली असल्याचे निष्पन्न झाले. वैयक्तिक तणावात येऊन त्यांनी हे कृत्य केल्याचा जबाब दिल्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले.