Omicron Variant : चिंता नको ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत २० हजार रुग्ण घरीच होणार बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 15:47 IST2021-12-07T15:41:27+5:302021-12-07T15:47:18+5:30
Omicron Variant: रुग्णालयात उपचारासाठी भरती कराव्या लागणाऱ्या संभाव्य ११ हजार रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे शासकीय रुग्णालयांत दाखल होतील.

Omicron Variant : चिंता नको ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत २० हजार रुग्ण घरीच होणार बरे
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाच्या (Corona in Aurangabad ) ओमायक्राॅन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसऱ्या लाटेत जेवढे रुग्ण सक्रिय होते, त्याच्या दीडपट रुग्ण तिसऱ्या लाटेत सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार जिल्ह्यात ३१ हजार ९२३ रुग्ण सक्रिय राहण्याचा अंदाज आरोग्य विभागाने काढला आहे. मात्र, यातील ६५ टक्के म्हणजे २० हजार ७५० रुग्ण हे होम आयसोलेशनमध्येच बरे होणार आहेत. तर ३५ टक्के म्हणजे ११ हजार १७३ रुग्णांना रुग्णालयात भरती करावे लागेल.
राज्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाचा एकच कहर पाहायला मिळाला. रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आणि मृत्यूचेही प्रमाण वाढले. दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेची ऑक्सिजनपासून इतर उपचार सुविधांच्या बाबतीत कसोटीच लागली. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आतापासूनच खबरदारीची पावले टाकत आहे. रुग्णालयात उपचारासाठी भरती कराव्या लागणाऱ्या संभाव्य ११ हजार रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण हे शासकीय रुग्णालयांत दाखल होतील. ५ हजार ५८७ रुग्णांपैकी केवळ २२३ जणांनाच व्हेंटिलेटरची गरज भासेल, असा अंदाज आहे. दुसऱ्या लाटेत एकाच वेळी रुग्णालयांत १५ हजार रुग्ण दाखल होते.
६० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरजही पडणार नाही
तिसरी लाट आली तर शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या ६० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरजही पडणार नाही. केवळ ३२ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडू शकते. ४ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर राहतील. त्यानुसार रोज ४६ मे. टन ऑक्सिजनचा साठा असणे अपेक्षित आहे. घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, महापालिका आणि जि. प.चे आरोग्य विभाग तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहेत. त्यादृष्टीने ऑक्सिजन सुविधेत वाढ करण्यासह उपचार सुविधाही सज्ज केली जात आहे.
शक्यता गृहीत धरून तयारी
रुग्ण कधी वाढणार, हे स्पष्टपणे सांगता येत नाही. परंतु तशी शक्यता गृहीत धरून उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. सोयीसुविधांचा आढावा घेतला जात आहे. आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
- बाळासाहेब चव्हाण, आरोग्य उपसंचालक