वृद्ध, निराधारांची दिवाळीत उपेक्षाच
By Admin | Updated: October 30, 2014 00:28 IST2014-10-30T00:07:47+5:302014-10-30T00:28:24+5:30
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी तालुक्यातील वृद्ध व निराधारांना शासकीय मानधन न मिळाल्याने तसेच स्वस्त धान्य दुकानातून होणारा धान्य पुरवठाही वेळेवर न

वृद्ध, निराधारांची दिवाळीत उपेक्षाच
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी तालुक्यातील वृद्ध व निराधारांना शासकीय मानधन न मिळाल्याने तसेच स्वस्त धान्य दुकानातून होणारा धान्य पुरवठाही वेळेवर न झाल्याने अंबाजोगाई तालुक्यात १७ हजार ५० वृद्ध व निराधारांची उपेक्षाच झाली. निवडणूक प्रक्रियेत अडकलेल्या महसूल कर्मचाऱ्यांमुळे कामकाज रखडल्याचा मोठा फटका वृद्ध व निराधारांना निमूटपणे सहन करावा लागला.
अंबाजोगाई तालुक्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, अशा विविध योजनेअंतर्गत एकूण १७ हजार ५० लाभधारक आहेत. ला लाभधारकांना शासनाच्या वतीने प्रतिमहिना ठरल्याप्रमाणे मानधन दिले जाते. रमजान ईदला मानधन प्राप्त झाले. त्यानंतर पुढील मानधन दिवाळीला मिळेल व उपेक्षितांची दिवाळी मानधनाच्या आधारावर साजरी होईल, अशी अपेक्षा निराधार व वृद्धांना होती. मात्र, दिवाळी लोटली तरी अद्यापही निराधार व वृद्धांच्या खात्यावर त्यांच्या अनुदानित मानधनाची रक्कम अद्यापही जमा झाली नाही. परिणामी दिवाळीचा सण मानधनाविनाच साजरा करण्याची वेळ या उपेक्षितांवर आली.
महसूल प्रशासनाच्या वतीने पुरवठा विभागाच्या माध्यमातून विविध शिधापत्रिकांद्वारे धान्य पुरवठा केला जातो. हा धान्य पुरवठा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तरी सुरळीत होईल व सर्वांना दिवाळी साजरी करता येईल. अशी अपेक्षा होती. मात्र, अपुऱ्या प्रमाणात आलेला धान्यसाठा यामुळे कोणाला साखर मिळाली तर कोणाला गहू, तांदूळ मिळाले तर अनेकांना माल संपल्याने दिवाळी सणापासून वंचित राहण्याची वेळ आली. केशरी कार्डधारकांना तर दिवाळीसाठी साखर मिळणे, मोठे जिकरीचे काम ठरले. त्यातच अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत नवीन पंधराशे लाभार्थ्यांनी आपले अर्ज पुरवठा विभागाकडे दाखल केले आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ही संधी आपल्याला उपलब्ध होईल, अशी अपेक्षा बाळगलेल्या नवीन शिधापत्रिकाधारकांची अपेक्षा फोल ठरली.
या संदर्भात अंबाजोगाईचे तहसीलदार राहुल पाटील यांच्याकडे विचारणा केली असता महसूल प्रशासनातील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले होते. परिणामी कार्यालयातील कामकाजाला याचा मोठा फटका बसला. मात्र, या आठवड्यात वृद्ध व निराधारांचे मानधन त्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.