रविवारच्या बाजारात विकले जुने पोस्टकार्ड

By Admin | Updated: December 15, 2014 00:49 IST2014-12-15T00:46:12+5:302014-12-15T00:49:41+5:30

औरंगाबाद :एकीकडे पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्रांची विक्री कमी झाली आहे; मात्र रविवारच्या आठवडी बाजारात चक्क ५ ते १० रुपये खर्चून जुने रद्दीतील पोस्टकार्ड खरेदी केले जात आहे.

Old postcards sold on Sunday market | रविवारच्या बाजारात विकले जुने पोस्टकार्ड

रविवारच्या बाजारात विकले जुने पोस्टकार्ड

औरंगाबाद : इंटरनेटच्या दुनियेत संदेश एका सेकंदात जगात कुठेही पाठविला जातो. परिणामी एकीकडे पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्रांची विक्री कमी झाली आहे; मात्र रविवारच्या आठवडी बाजारात चक्क ५ ते १० रुपये खर्चून जुने रद्दीतील पोस्टकार्ड खरेदी केले जात आहे. कोरे सोडाच; पण लिहिलेले पोस्टकार्डही खरेदी करणारे महाभाग येथे पाहण्यास मिळत आहेत.
जाफरगेट परिसरात भरणाऱ्या रविवारच्या आठवडी बाजारात जुन्या वस्तूंचे संग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांची पारखी नजर सर्वत्र भिरभिर फिरत असते. दुर्मिळ वस्तूची तिप्पट-चौपट रक्कम मोजून ते खरेदी करीत असतात.
आज या आठवडी बाजारात चक्क जुने रद्दीतील पोस्टकार्ड विक्रीसाठी आले होते. काही कोरे होते, तर काही गठ्ठ्यांत लिहिलेले पत्र होते. त्यात काही पोस्टकार्ड १९८० ते १९९० या काळातील होते. काही पत्रांचे काठ फाटलेले होते, तर काहींचा तुकडा पडलेला होता. काही पत्रांवर पाण्याचे शिंतोडे पडून शाई पसरलेली होती. एरव्ही कोणी हे पोस्टकार्ड फेकून दिले असते; पण चतुर विक्रेत्यांनी ते विक्रीला ठेवले आणि निम्म्यापेक्षा अधिक कार्ड विक्री झाले. कोरे कार्ड १० रुपये, तर मजकूर लिहिलेले पोस्टकार्ड ५ रुपयांना विकले जात होते. खरेदीदारही एक साथ ५ ते १० कार्ड खरेदी करीत होते. विक्रेता मेहमूदभाई यांनी सांगितले की, अनेकांना जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो. त्यात पोस्टाचे तिकीट, पोस्टकार्डचे संग्रह करणारे अनेक जण आहेत. त्यांच्याकडून १९९० च्या अगोदरच्या पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्रांना जास्त मागणी असते. रद्दीत सापडलेले पोस्टकार्ड आम्ही गोळा करतो व विकतो. रमेश घोरपडे या संग्राहकाने सांगितले की, पोस्टकार्ड जमवण्याचा माझा छंद आहे. आज पोस्टखात्याचा १९८२ चा शिक्का असलेले पोस्टकार्ड खरेदी केले.

Web Title: Old postcards sold on Sunday market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.