जागा वाटपाचा जुनाच फॉर्म्यूला !

By Admin | Updated: August 26, 2014 00:09 IST2014-08-26T00:09:15+5:302014-08-26T00:09:15+5:30

संतोष धारासूरकर , जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातील काँग्रेस आघाडी व महायुतीतील जागा वाटपाच्या फॉम्यूल्यात कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्ट संकेत आहेत.

Old Allocation Formula! | जागा वाटपाचा जुनाच फॉर्म्यूला !

जागा वाटपाचा जुनाच फॉर्म्यूला !


संतोष धारासूरकर , जालना
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातील काँग्रेस आघाडी व महायुतीतील जागा वाटपाच्या फॉम्यूल्यात कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्ट संकेत आहेत.
या जिल्ह्यात घनसावंगी, बदनापूर व भोकरदन या तीन जागा आघाडीतून राष्ट्रवादीच्या, जालना व परतूर या दोन जागा काँग्रेसच्या हिश्यास आहेत. दोन ठिकाणी राष्ट्रवादी व एका ठिकाणी काँग्रेसचे आमदार सत्तेवर आहेत. राजकीयदृष्ट्या तीन जागा राष्ट्रवादीच्या हिश्यात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या १४ जुलैच्या दौऱ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या जिल्ह्यात आणखी एक जागा सोडवून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे विधान केले होते.
चौथ्या जागेचा प्रस्ताव सादर करा, अशी सूचना केली. खुद्द प्रदेशाध्यक्षांच्या या विधानाने काँग्रेसजनांसह स्वकीय पुढारी सुद्धा चक्रावून गेले होते.
या दौऱ्यापासून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात काँग्रेस आघाडीतंर्गत चौथ्या जागेचा विषय चर्चेला येणार हे स्पष्ट दिसत होते. पण ती चौथी जागा नेमकी कोणती? असा सवाल होत होता. कारण जालना विधानसभेतून काँग्रेस प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यामुळे या जागेच्या मागणीचा प्रश्नच उद््भवत नव्हता. राहिला परतूर विधानसभा मतदार संघ. येथून काँग्रेस सलग तीन निवडणुकांतून पराभूत झाली खरी, परंतु या निवडणुकीत विद्यमान आमदार सुरेश जेथलिया हेच स्वत: काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस पुरस्कृत आमदाराची जागा राष्ट्रवादीस सोडणे हे काँग्रेस जणांना संयुक्तीक ठरणारे नाही.
काँग्रेसजनांनीही जेथलिया यांना निवडणुकीस सज्ज राहण्याचा सल्ला दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब आकात हे अंतिम प्रयत्न करीत असले तरीही ते अपक्ष म्हणूनही निवडणूक लढविण्याच्या मनस्थितीपर्यंत आले आहेत. परिणामी आघाडी अंतर्गत राष्ट्रवादीने सुरु केलेल्या चौथ्या जागेचा विषय बोलाची कढी बोलाचा भात ठरणार हे स्पष्ट आहे.
काँग्रेस आघाडी प्रमाणे महायुतीतही जागा वाटपा संदर्भात मध्यंतरी विनाकारण वावड्या उठविण्याचा प्रयत्न झाला. विशेषत: भाजपाच्या नेते मंडळीने तो प्रयत्न केला. पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीतच पाचही ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी आणख्या एका जागेसाठी भाजप प्रयत्न करणार असल्याचा छातीठोकपणे दावा केला. परंतु तोही दावा फोल ठरणार अशी चिन्हे आहेत.
घनसावंगी, जालना व बदनापुरातून शिवसेनेचे उमदेवार जवळपास स्पष्ट आहेत. ते कामासही जुंपले आहेत. त्यामुळे त्या तीनही जागा शिवसेनेकडून सोडण्याचा प्रयत्नच उद्भवत नाही.
वाढीव जागे संदर्भात कोणाकडून फारसे गांभीर्याने प्रयत्न होताना दिसत नाही. विशेष म्हणजे इच्छुकही त्या संदर्भात आक्रमक नाहीत. पक्ष श्रेष्ठींकडून त्या संदर्भात अद्यापपर्यंत कोणतेही संकेत मिळालेले नाही. जागांच्या अदलाबदलीच्या खेळ्यांमध्ये अपवादात्मक स्थितीत ऐनवेळी एखादा बदल झाला तरच परिस्थिती उद्भवू शकेल, अन्यथा जुनाच फॉम्यूला कायम राहील.

Web Title: Old Allocation Formula!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.