विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग; विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 12:10 IST2021-09-10T12:06:55+5:302021-09-10T12:10:50+5:30
तू मला पहिल्याच नजरेत आवडलीस, तुझ्याशी मैत्री करायची आहे

विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग; विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा
औरंगाबाद : विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह भाषेत चॅटिंग केल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime of molestation against the public relations officer of the university)
पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार विद्यापीठातील एका विभागात शिक्षण घेत असलेली एक विद्यार्थिनी विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याकडे माहिती विचारण्याच्या संदर्भात गेली होती. संबंधित विद्यार्थिनीस माहिती दिल्यानंतर त्याच रात्री मोबाइलवरून तिच्याशी शिंदे यांनी आक्षेपार्ह भाषेत चॅटिंग केले. रात्री उशिरापर्यंत शिंदे यांचे मेसेज आल्यामुळे ती पुरती वैतागून गेली. शिंदे यांच्या रात्री उशिरापर्यंतच्या आक्षेपार्ह चॅटिंगमुळे संतापलेल्या विद्यार्थिनीने विद्यापीठाच्या विशाखा समितीकडे तक्रार दाखल केली. मात्र दोन दिवस त्यावर कारवाई न झाल्याने पोलिसात धाव घेतली. विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
असे केले मेसेज -
३ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता व्हाॅट्सॲपवरून संजय शिंदे यांनी विद्यार्थिनीला ‘हाऊ आर यू डीअर पद्मावती (नाव बदललेले आहे)’, ‘प्लीज डोन्ट माइंड, बट यू आर सो ब्युटीफुल’ असे मेसेज केले. तसेच तू मला पहिल्याच नजरेत आवडलीस, तुझ्याशी मैत्री करायची आहे, अशा प्रकारचे अनेक मेसेज साडेअकरा वाजेपर्यंत केले आहेत.