स्मार्ट सिटीच्या सीईओ पदी नियुक्तीवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST2021-02-05T04:14:54+5:302021-02-05T04:14:54+5:30

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन प्रा. लिमिटेड कंपनीच्या चेअरमनपदी शासनाने प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली, तर मुख्य कार्यकारी ...

Objection to the appointment of CEO of Smart City | स्मार्ट सिटीच्या सीईओ पदी नियुक्तीवर आक्षेप

स्मार्ट सिटीच्या सीईओ पदी नियुक्तीवर आक्षेप

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन प्रा. लिमिटेड कंपनीच्या चेअरमनपदी शासनाने प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली, तर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार महापालिकेच्या आयुक्तांकडे सोपविण्यात आला. पदसिद्ध सीईओ म्हणून महापालिका आयुक्त आजपर्यंत काम पाहत आले आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी नगर विकास विभागाने स्मार्ट सिटीच्या सीईओपदी मुख्याधिकारी संवर्गातील बाबासाहेब मनोहरे यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. त्यामुळे आपोआप मनपा प्रशासक पांडेय यांच्याकडील स्मार्ट सिटीचा पदभार कमी झाला. आता पांडेय यांनी या नियुक्तीवर आक्षेप नोंदविला असून, ही नियुक्ती रद्द करण्याची लेखी मागणी नगर विकास विभागाकडे केली आहे. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्याकडे याबाबतचे पत्र पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील काही महिन्यांपासून पांडेय उत्कृष्ट काम करीत आहेत. त्यांना सीईओपदी कायम ठेवावे, अशी मागणी माजी महापौर घोडेले यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे केली.

पत्रात काय म्हटले आहे

पांडेय यांनी पत्रात १८ जून २०१६ च्या पत्राचा हवाला दिला आहे. त्यानुसार स्मार्ट सिटीचे सीईओ हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतील आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा नियुक्तीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल, असे नमूद आहे. मनोहरे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नाहीत. याशिवाय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाने याआधीच सीईओ म्हणून मनपा आयुक्तांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे सध्या हे पद रिक्त नाही, असा दाखला दिल्याचेही सूत्रांकडून समजते.

Web Title: Objection to the appointment of CEO of Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.