पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 05:12 IST2025-05-16T05:11:15+5:302025-05-16T05:12:36+5:30

राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानची अवस्था अशी झाली आहे की, जिथे तो उभा राहातो, तिथून भीक मागणाऱ्यांची रांग सुरू होते. त्याउलट भारताची गणना ही आयएमएफला निधी देणाऱ्या देशांमध्ये होते. 

where pakistan stands the beggars queue begins said rajnath singh | पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा

पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीनगर : पाकिस्तान हे दुष्ट प्रवृत्तीचे राष्ट्र असल्याने त्याच्या ताब्यात असलेली अण्वस्त्रेही सुरक्षित नाहीत. त्यामुळे ही अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेच्या (आयएइए)च्या देखरेखीखाली ठेवली पाहिजेत, अशी मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केली. ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांनी प्रथमच जम्मू - काश्मीरमध्ये येऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला. 

पाकने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्जासाठी पुन्हा हात पसरले होते. त्याबद्दल राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानची अवस्था अशी झाली आहे की, जिथे तो उभा राहातो, तिथून भीक मागणाऱ्यांची रांग सुरू होते. त्याउलट भारताची गणना ही आयएमएफला निधी देणाऱ्या देशांमध्ये होते. 

राजनाथसिंह म्हणाले की, अण्वस्त्रांच्या वापराच्या पाकिस्तानने सातत्याने दिलेल्या धमक्यांकडे भारताने लक्ष दिले नाही. पाकिस्तानसारख्या बेजबाबदार व दुष्ट प्रवृत्तीच्या देशाच्या ताब्यात अण्वस्त्रांसारख्या गोष्टी असाव्यात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही अण्वस्त्रे आयएइएच्या देखरेखीखाली ठेवायला हवीत.  ते म्हणाले की, गेल्या ३५-४० वर्षांपासून भारताला सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कृत्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत कोणत्याही टोकाला जाऊन कारवाई करू शकतो, हे साऱ्या जगाने पाहिले आहे. 

भारतावर घाव घालण्याचा, सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा प्रयत्न पहलगाम हत्याकांडाद्वारे करण्यात आला. त्याला आम्ही चोख प्रत्युत्तर दिले. पाकने दहशतवाद्यांना पोसणे बंद करावे तसेच आपल्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

पाकने भारताला वारंवार फसवले

राजनाथसिंह म्हणाले की , आमच्या भूमीतून दहशतवादी कारवाया करण्यात येणार नाहीत, असे आश्वासन २१ वर्षांपूर्वी वाजपेयींच्या पाकिस्तान दौऱ्याप्रसंगी त्या देशाने दिले होते. तो शब्द कधीच पाळण्यात आला नाही. पाकने भारताला वारंवार फसविले आहे. त्यामुळे यापुढे देशावर कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर ती युद्धजन्य कृती मानली जाईल.

पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला दणका

पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारताने गुरुवारी अजून एक दणका दिला. देशातील विविध विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा पुरविण्यासाठी निवडलेल्या तुर्कीच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. या कंपनीकडून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून हे काम आता केंद्र सरकारकडून काढून घेण्यात आले आहे.

मी मध्यस्थी नव्हे, तर मदत केली : ट्रम्प यांचे घूमजाव

भारत व पाकिस्तानमध्ये अमेरिकेने मध्यस्थी केल्यामुळेच शस्त्रसंधी झाली, असे वारंवार सांगून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मूळ भूमिकेपासून गुरुवारी घूमजाव केले. या दोन्ही देशांतील तणाव कमी होण्यासाठी मी मध्यस्थी केली, असे म्हणणार नाही; पण शस्त्रसंधी होण्यासाठी त्या देशांना मदत नक्की केली, असे आता ट्रम्प म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू झाला. त्यामध्ये डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे, परस्परांवर केला जाणारा मारा यातून खूप मोठ्या संघर्षाची शक्यता दिसू लागली. त्यामुळे अमेरिकेने हा तणाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले.

सिंधू जलवाटप करारावर  पाकिस्तानची चर्चेची तयारी

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १९६० सालचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला. मात्र, त्यानंतर काही आठवड्यांतच पाकिस्तानने या करारावर भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती सुत्रांनी गुरुवारी दिली. 

पाकिस्तानचे जलसंपदा सचिव सय्यद अली मुर्तजा यांनी भारताने बजावलेल्या नोटिशीला उत्तर दिले आहे. भारताने उपस्थित केलेल्या आक्षेपांवर चर्चेची तयारी असल्याचे मुर्तजा यांनी भारताच्या जलशक्ती खात्याचे सचिव देवश्री मुखर्जी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाला कायदेशीर आधार नसल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

 

Web Title: where pakistan stands the beggars queue begins said rajnath singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.