आष्टी तालुक्यात परिचारिका पगाराविना
By Admin | Updated: September 26, 2014 01:54 IST2014-09-26T00:38:50+5:302014-09-26T01:54:32+5:30
कडा : आरोग्य विभागात महत्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या कंत्राटी परिचारिकांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत. पगार रखडल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

आष्टी तालुक्यात परिचारिका पगाराविना
कडा : आरोग्य विभागात महत्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या कंत्राटी परिचारिकांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत. पगार रखडल्याने उपासमारीची वेळ आली आहे. असे असताना देखील आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. चोवीस तास रूग्णांची सेवा अल्पदरात करणाऱ्या खाजगीकरण करण्यात आलेल्या परिचारीकांचे पगार त्वरित करून त्यांना सेवेत कायम करून घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आष्टी तालुक्यातील ३५ आरोग्य उपकेंद्रावर २००५ साली आरोग्य विभागाच्या माध्यमातून कायमस्वरूपी परिचारिकेच्या मदतीला कंत्राटी परिचारिकेची भरती करण्यात आली. सुरूवातीला सहा हजार रुपये प्रतिमहिना असे मानधन दिले जात होते. आता दोन वर्षांपासून सहा हजारांचे आठ हजार रुपये मानधन दिले जाऊ लागले आहे. पण कायमस्वरूप परिचारिका उपकेंद्रात निवासी राहत असल्याने व सतत गैरहजर राहत असल्याने चोवीस तास या कंत्राटी परिचारिकांनाच काम पहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडली आहे. यातच आरोग्य विभागाने देऊ केलेले मानधन हे अल्प स्वरूपाचे असल्याने चोवीस तास सेवा करूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही. कुटुंबाची आर्थिक घडी बिघडत चालली आहे. आम्हाला मानधन वाढवून कायमस्वरूपी तत्वावर घेण्यात यावे, अशी मागणीही परिचारिका करू लागल्या आहेत.
तालुक्यातील स्थिती
आष्टी तालुक्यामध्ये आरोग्य सेविका २५, आरोग्य सहायक ४, औषध निर्माता १, गट प्रवर्तक ५, स्टाफ नर्स २ अशी तालुक्यातील परिचारीकांची पदसंख्या आहे.
आरोग्य विभागाचे होतेय दुर्लक्ष
अल्प मानधनात २४ तास सेवा करूनही त्यांना पगार दिले जात नाहीत. त्यामुळे या परिचारीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिचारीकांच्या प्रश्नांकडे आरोग्य विभागाचे साफ दुर्लक्ष आहे. वरिष्ठ अधिकारी याची कुठलीही दखल घेत नसल्याने परिचारीकांमधून संताप व्यक्त होत आहे. अनेकवेळा परिचारीकांनी आंदोलने, उपोषणे केली. मात्र त्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. वरिष्ठ अधिकारीही याकडे गांभिर्याने पाहत नसल्याचा आरोप येथील परिचारीकांनी केला आहे. आमच्या प्रश्नाची दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी शालिनी कांबळे, अंबिका कर्डीले, मंगल वाल्हेकर या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बापू चाबुकस्वार म्हणाले, परिचारीकांच्या प्रश्नाचा वरिष्ठांकडे पाठपुरावा चालू आहे. त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुकास्तरावरूनही प्रयत्न चालू आहे. परिचारीकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले.(वार्ताहर)
ज्या कायमस्वरुपी परिचारिका आहेत, त्या वेळेवर हजर राहत नसल्याने याच कंत्राटी परिचारिकांना चोवीस तास सेवा करावी लागते.
४मानधनात वाढ करून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी वरिष्ठांकडे वेळोवेळी केला जातोय पाठपुरावा.
४वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिचारिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप.
४अल्प मानधन असल्याने कुटुंबाचा गाडा चालविणेही झाले अवघड