आता बिनधास्त चालवा सायकल; क्रांतीचौक ते उस्मानपुरा सर्कलपर्यंत ‘सायकल ट्रॅक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:25 IST2020-10-20T18:19:35+5:302020-10-20T18:25:39+5:30
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या सायकल फाॅर चेंज चॅलेंजमध्ये औरंगाबाद शहर भाग घेत आहे.

आता बिनधास्त चालवा सायकल; क्रांतीचौक ते उस्मानपुरा सर्कलपर्यंत ‘सायकल ट्रॅक’
औरंगाबाद : शहरात तरुणाई आणि सायकलप्रेमींना स्वतंत्र ट्रॅक तयार करून देण्यासाठी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला आहे. क्रांतीचौक ते उस्मानपुरा सर्कलपर्यंत तीनशे मीटर लांबीचे रस्ते रंगविले असून, ते सायकल ट्रॅक म्हणून चिन्हांकित केले आहेत.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या सायकल फाॅर चेंज चॅलेंजमध्ये औरंगाबाद शहर भाग घेत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून शहरातील सायकल चालकांसाठी कमीत कमी पाच किलोमीटरचा ट्रॅक बनवला जाणार आहे. याव्यतिरिक्त शहरातील एक परिसर सायकल चालवण्यासाठी सुरक्षित आणि मैत्रीपूर्ण बनवला जाणार आहे. यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि औरंगाबाद महानगरपालिका नागरिकांसोबत चर्चा व काम करीत आहे. याचाच एक भाग म्हणून, सायकलिस्ट नितीन घोरपडे आणि त्यांच्या टीमने क्रांतीचौक ते उस्मानपुरा सर्कलपर्यंतचा ३०० मीटरचा रस्ता सिमेंट पेंट वापरून सायकल ट्रॅक म्हणून चिन्हांकित केला आहे.
या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये सायकल ट्रॅकबद्दल जनजागृती निर्माण करण्यात मदत होईल, असे घोरपडे म्हणाले. सायकल फाॅर चेंज मोहीमच्या अंमलबजावणीसाठी गठित समितीचे ते सदस्यही आहेत. रस्त्याला सायकल ट्रॅक म्हणून चिन्हांकित केल्यामुळे प्रशासनालाही लोकांची वागणूक समजून घेता येईल. मनपा प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.