कुख्यात 'मेजर'ने जामीन मिळताच छत्रपती संभाजीनगरजवळ टाकला बनावट नोटांचा कारखाना

By सुमित डोळे | Updated: August 2, 2025 12:33 IST2025-08-02T12:32:35+5:302025-08-02T12:33:44+5:30

२०१५ पासून दोन नावांनी मेजर रॅकेटमध्ये सक्रिय-अल्पवयीन मुलांचाही वापर, २०१९ पासून छत्रपती संभाजीनगरात सातत्याने तयार होताहेत बनावट नोटा

Notorious criminal 'Major' set up a fake currency factory near Chhatrapati Sambhajinagar as soon as he got the land | कुख्यात 'मेजर'ने जामीन मिळताच छत्रपती संभाजीनगरजवळ टाकला बनावट नोटांचा कारखाना

कुख्यात 'मेजर'ने जामीन मिळताच छत्रपती संभाजीनगरजवळ टाकला बनावट नोटांचा कारखाना

छत्रपती संभाजीनगर : शहरात प्रामुख्याने कोरोनाकाळापासून बनावट नोटांच्या छापखान्यांच्या रॅकेटमध्ये मोठी वाढ झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये पोलिसांना सर्वप्रथम या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अंबादास रामभाऊ ससाणे ऊर्फ अरुण भास्कर वाघ ऊर्फ मेजरचे (४५, रा. शहर टाकळी, ता. शेवगाव) नाव निष्पन्न झाले होते. त्यात अटक होऊन जामिनावर सुटल्यानंतर त्याने शहरातच राहत लाखोंच्या मशिनरी, प्रिंटरचा सेटअप उभारून बनावट नोटांचा छापखानाच उघडला. २०१९ पासून जवळपास ७ वेळा हे रॅकेट वारंवार उघडकीस येऊनही शहर पोलिसांसह एटीएसदेखील याची पाळेमुळे शोधण्यात अपयशी ठरले.

२७ जुलै रेाजी मेजरच्या टोळीतील २ एजंट निखिल गांगर्डे व सोमनाथ शिंदे यांना अहिल्यानगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ४ दिवसांच्या चौकशीत बीडच्या प्रदीप कापरेसह शहरातील मंगेश शिरसाठ ( ४०, रा. शिवाजीनगर ), विनोद अरबट ( ५३, रा. सातारा), आकाश बनसोडे (२७, रा. पेठेनगर) , अनिल पवार ( ३४ रा. मुकुंदनगर ) यांच्यापर्यंत पोलिस पोहोचले. ३१ जुलै रोजी तीसगावमध्ये पोलिस पोहोचल्याची कुणकुण लागताच मेजर पसार झाला, तर छापखाना बंद करून मेसवर जेवायला गेलेल्या अनिल, आकाशच्या सहायक निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी मुसक्या आवळल्या.

तीन महिन्यांपूर्वी हलवला छापखाना
ससाणेने ३ महिन्यांपूर्वी तीसगावमध्ये निर्मनुष्य परिसरात आलिशान घर भाडेतत्त्वावर घेतले. या घराचा मालक शहरात राहत असल्याने त्यांना तेथे छापखाना उघडणे सुसह्य झाले. पोलिसांच्या पाहणीत मोठ्या आकाराचे प्रिंटर, विविध रंगाच्या नोटा छापता येतील अशा ४ रंगांच्या कॅन, कागदाचे गठ्ठे असा २८ लाखांचा मुद्देमाल आढळला.

कारागृहात मैत्री, जामिनासाठी मदत
स्वत:ला मेजर म्हणवणारा ससाणे अरुण वाघ नावही वापरतो. २०२३ मध्ये मुकुंदवाडी पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर, २०२० पासून खुनाच्या गुन्ह्यात कारागृहातील आकाश बनसोडेसाेबत त्याची ओळख झाली. त्याचदरम्यान पवार हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. तेथेच सर्वांची मैत्री झाली. काही महिन्यांपूर्वीच ससाणेने बनसोडेच्या जामिनासाठी मदत करून बाहेर आणले. त्यानंतर तिघांनी छापखाना सुरू केला.

अल्पवयीन मुलांचा वापर
-ससाणेसह सर्व आरोपी फावल्या वेळेत प्लॉटिंग, वाहन खरेदी- विक्रीचे एजंट म्हणून काम करायचे. त्याच कामातून सर्व आरोपींची एकमेकांसोबत ओळख झाली.
-ससाणे २०१५ पासून बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये सक्रिय आहे. २०२३ मध्ये पकडला गेल्यानंतर त्याने शहरातील अनेक अल्पवयीन मुलांना यात सहभागी करून घेतले होते.

२०१९ पासून शहरात छापखान्यांची पार्श्वभूमी
-नोव्हेंबर २०१९ मध्ये कोरोनाकाळात पुंडलिकनगर पोलिसांनी शेख समरान या उच्चशिक्षित तरुणाचा बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आणला.
-डिसेंबर २०२१ मध्ये हाच समरान जामिनावर सुटताच पुन्हा सक्रिय झालेला निष्पन्न होत कारागृहात गेला.
-ऑक्टोबर २०२३ मध्ये तत्कालीन पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी सर्वप्रथम ससाणे ऊर्फ मेजरचे रॅकेट उघडकीस आणले.
-२१ जुलै २०२३ मध्ये वैजापूरमध्ये उघडकीस आलेल्या रॅकेटमध्येही बीडपर्यंत धागेदोरे जात माजलगाव, परळीच्या तरुणांना अटक.
-मार्च २०२४ मध्ये संतोष विश्राम शिरसाठ याला सिटीचौक पोलिसांनी बनावट नोटांसह पकडले.
-एप्रिल २०२५ मध्ये बजाजनगर येथील बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये बनावट नोटा आढळल्या.
--जून २०२५ मध्ये छावणी बाजारात अहिल्यानगरचा राजन ब्राह्मणे बनावट नोटांसह सापडला. त्यात वाळूजचा माणिक आव्हाड हा देखील निष्पन्न झाला होता.

Web Title: Notorious criminal 'Major' set up a fake currency factory near Chhatrapati Sambhajinagar as soon as he got the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.