‘व्हायवा’च्या दिवशीच मिळणार पीएच.डी.चे नोटिफिकेशन; विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय
By राम शिनगारे | Updated: November 14, 2025 19:29 IST2025-11-14T19:28:59+5:302025-11-14T19:29:21+5:30
२९ नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश

‘व्हायवा’च्या दिवशीच मिळणार पीएच.डी.चे नोटिफिकेशन; विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच.डी. विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा २९ नोव्हेंबरपर्यंत करण्याचे आदेश कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी विभागाला दिले आहेत. त्यासाठी प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे हे दररोज विभागाचा आढावा घेत असून, पीएच.डी.चा व्हायवा झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता संबंधित संशोधकास नोटिफिकेशन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याविषयीचे आदेश परीक्षा संचालकांच्या सहीने बुधवारी (दि.१२) काढण्यात आले आहेत.
पीएच.डी. विभागात संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रलंबित कामांचा विषय चर्चेत आहे. त्याविषयी ‘लोकमत’मध्ये तीन भागाची वृत्त मालिका प्रकाशित केली होती. याची दखल घेत कुलगुरू डॉ. फुलारी यांनी पीएच.डी. विभागाचा दैनंदिन आढावा घेतला आहे. त्याशिवाय प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे हे दररोज प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करीत आहेत. येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत प्रलंबित कामांची पेंडन्सी झीरो करण्याचे टार्गेट कुलगुरूंनी दिले. त्यानंतरही कामे प्रलंबित राहिल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
कामाची केली विभागणी
पीएच.डी. विभागातील कामांची विभागणीही प्रकुलगुरूंच्या उपस्थितीत केली आहे. त्याचवेळी विभागात आणखी एक सहायक कुलसचिव आशिष वडोदकर यांची नियुक्ती केली आहे. डॉ. पंजाबराव पडूळ आणि वडोदकर हे प्रत्येकी दोन विद्याशाखांचे काम पाहणार आहेत.
दोन वाजेपूर्वीच होणार व्हायवा
पीएच.डी.ची मौखिक परीक्षा (व्हायवा) दोन वाजेच्या पूर्वीच घेण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित संशोधकाला नोटिफिकेशन देण्यात येणार आहे. त्याविषयीची जबाबदारी ही संबंधित विषयाच्या वरिष्ठ सहायकाची असणार आहे.
ऑनलाइनसाठी कुलगुरूंसमोर सादरीकरण
पीएच.डी. विभागाचे संपूर्ण कामकाजच ऑनलाइन करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी १ डिसेंबरपासून होणार आहे. त्यासाठी कुलगुरू डॉ. फुलारी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत सादरीकरण केले आहे. त्यात काही बदल सुचविल्यानंतर त्यात दुरुस्ती करून कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पीएच.डी. विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा ८० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात करण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात येत आहेत. त्याशिवाय वाढीव मनुष्यबळही देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अतिशय वेगवान आणि तात्काळ विद्यार्थ्यांना प्रतिसाद मिळणार आहे.
-डॉ.वाल्मिक सरवदे, प्रकुलगुरू