पोलिसांची व्यावसायिकांना नोटीस
By Admin | Updated: May 17, 2016 00:03 IST2016-05-16T23:57:49+5:302016-05-17T00:03:35+5:30
नांदेड : शहरातील देगलूर नाका परिसरात वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असून त्यामुळे या ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत़ याबाबत अनेकवेळा पोलिसांकडून कारवाईही केली जाते़

पोलिसांची व्यावसायिकांना नोटीस
नांदेड : शहरातील देगलूर नाका परिसरात वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असून त्यामुळे या ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत़ याबाबत अनेकवेळा पोलिसांकडून कारवाईही केली जाते़ परंतु या भागातील वाहतुकीचा प्रश्न अद्यापही सुटला नाही़ त्यावर तोडगा म्हणून आता पोलिसांनी दुकानासमोर अवैध पार्कींग करु देवू नये यासाठी व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत़ तसेच कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे़
देगलूर नाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते़ त्यात हॉटेल आणि दुकानासमोर बेशिस्तपणे वाहनांची पार्कींग केली जाते़ तर रस्त्याच्या कडेला जड वाहने उभी केली जातात़ त्यामुळे दर महिन्याला या ठिकाणी अपघात होवून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे़ त्याचबरोबर वारंवार या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबाही होतो़
यावर अनेकवेळा कारवाई करुनही या ठिकाणच्या बेशिस्त वाहतुकीला अद्यापही शिस्त लागली नाही़ त्यामुळे आता पोलिसांनी बेशिस्त पार्कींगसाठी थेट व्यावसायिकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार, १९७३ च्या कलम १४९ नुसार दुकान, हॉटेल, घरासमोर कोणत्याही प्रकारे अवैध स्वरुपाची पार्कींग होवू देवू नये़ अन्यथा १८६० चे कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल अशा आशयाची नोटीस उपअधीक्षक अशोक बनकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आली आहे़ अशाप्रकारे परिसरातील अनेक व्यावसायिकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत़ पोलिसांच्या या बडग्यामुळे तरी, या भागातील वाहतुकीला शिस्त लागेल असे शक्यता वर्तविली जात आहे़
दरम्यान, जुना नांदेड परिसरात आतापर्यंत शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी फिरकत नव्हते आता मात्र त्यांचे पॉर्इंट लावण्यात आले आहेत़