कुलगुरूंच्या अचानक भेटीत गैरहजर १२ विभागप्रमुखांना नोटीस जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:50 IST2025-02-13T19:48:10+5:302025-02-13T19:50:11+5:30
प्राध्यापकांचे सोडा, विभागप्रमुखच गैरहजर; यापुढे कुलगुरू थेट प्राध्यापकांच्या तासिकांमध्ये जाऊन बसणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

कुलगुरूंच्या अचानक भेटीत गैरहजर १२ विभागप्रमुखांना नोटीस जारी
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय विभागांना अचानकपणे भेटी दिल्यानंतर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी नुकत्याच १६ विभागांना भेटी दिल्या. या १६ पैकी तब्बल १२ विभागांमध्ये प्रमुखच गैरहजर होते. त्यांना सूचनावजा नोटीस प्रशासनाने दिली आहे. यापुढे कुलगुरू थेट प्राध्यापकांच्या तासिकांमध्ये जाऊन बसणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
डॉ. फुलारी यांनी 'नॅक'च्या निमित्ताने विभागांना अनेक भेटी दिल्या. 'नॅक'कडून मूल्यांकन होण्यापूर्वीही त्यांनी अनेकदा प्रशासकीय विभागांना भेटी देऊन जागेवर हजर नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. त्याच वेळी विद्यापीठातील काही विभागांमध्ये विद्यार्थ्यांच्या तासिका होत नसल्याची चर्चाही सुरू होती. त्याचा परिणामही विद्यार्थी संख्या कमी होण्यात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात येत होता. त्यामुळे 'नॅक'चे मूल्यांकन झाल्यानंतर कुलगुरू डॉ. फुलारी यांनी त्याकडे सर्वाधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार मागील महिन्यात कुलगुरूंनी तासिकांना सुरुवात होण्यापूर्वी १६ विभागांना अचानकपणे भेटी दिल्या. या भेटीमध्ये चक्क १२ विभागांमध्ये विभागप्रमुखच अनुपस्थित होते. ज्यांच्याकडे विभागाची धुरा सोपविण्यात आलेली आहे तेच वेळेवर येत नसतील तर प्राध्यापकांना काय बोलावे, असा प्रश्न पडला. विशेष म्हणजे त्यातील बहुतांश विभागप्रमुख हे वरिष्ठ श्रेणीतील प्राध्यापक आहेत. त्यामुळे संबंधितांना नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.
१०० पेक्षा अधिक शिक्षकेतरांना नोटीस
कुलगुरू डॉ. फुलारी यांनी भेट दिल्यानंतर उशिरा आलेले, गैरहजर असलेल्या १०० पेक्षा अधिक कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही यापूर्वीच नोटीस बजावण्यात आल्याची माहिती कुलसचिव कार्यालयातून देण्यात आली.
सीसीटीव्ही बसविणार
विद्यापीठातील प्रत्येक विभागांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्याचे नियंत्रण कुलगुरू कार्यालयाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे कुलगुरूंना कार्यालयात बसूनही कोणत्या विभागात कोणते प्राध्यापक तासिका घेत नाहीत, याची माहिती सहज मिळेल.
विद्यार्थ्यांसोबत तासिकांना बसणार
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी विद्यापीठातील कोणत्याही विभागात सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या तासिकांना विद्यार्थ्यांसाेबत बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात विभागातील वेळापत्रकानुसार कुलगुरू प्राध्यपकांच्या तासिकांना हजेरी लावणार असल्याचेही समजते.