‘पुरातत्व’च नव्हे; स्थानिकांचीही पाठ !

By Admin | Updated: September 12, 2014 00:26 IST2014-09-12T00:13:38+5:302014-09-12T00:26:30+5:30

लातूर : पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जात असल्याचा बोलबाला होत असला तरी इतिहासकालीन महत्व असलेल्या लातूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्षच आहे.

Not only 'archeology'; Locals read! | ‘पुरातत्व’च नव्हे; स्थानिकांचीही पाठ !

‘पुरातत्व’च नव्हे; स्थानिकांचीही पाठ !




लातूर : पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जात असल्याचा बोलबाला होत असला तरी इतिहासकालीन महत्व असलेल्या लातूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्षच आहे. शिवाय, स्थानिक पर्यटकही या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याचे प्रमाण नगण्य आहे. उदगीर व औशाचा भुईकोट किल्ला व खरोसा लेण्यांच्या विकासाकडे कमालीचे दुर्लक्षच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ६९.३३ टक्के लोकांनी पर्यटनस्थळांचा विकास होत नसल्याचे मत या सर्वेक्षणातून नोंदविले आहे. तर ८.६७ लोकांनी विकास होत असल्याचे म्हटले आहे. तर २६.६७ टक्के लोकांनी काही प्रमाणात पुरातत्व खात्याचे लक्ष असल्याचे मत या सर्वेक्षणात व्यक्त केले आहे.
उदगीर व औशाचा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ही दोन्ही शहरे ऐतिहासिक म्हणून प्रसिद्ध आहेत. तर खरोशातील लेण्यांमुळे या गावाची ओळख जागतिक स्तरावर आहे. परंतु, हा ऐतिहासिक ठेवा जपण्यात जसे स्थानिक कमी पडत आहेत, तसे पुरातत्व विभागही उदासीन असल्याचे चित्र आहे. या पर्यटनस्थळांच्या देखभाल दुरुस्ती व पर्यटकांच्या भेटीबाबत ‘लोकमत’ने लातूर शहर, औसा शहर आणि खरोसा गावातील १५० लोकांशी सर्वेक्षणाद्वारे संवाद साधला. लातूर जिल्ह्यातील औसा व उदगीर येथील भुईकोट किल्ल्यांना पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत का, या प्रश्नावर उदगीर किल्ल्याला १६ टक्के, तर औसा येथील किल्ल्याला ८४ टक्के लोकांनी पर्यटक भेटी देतात, असे मत नोंदविले आहे. तर ५० टक्के लोकांनी पर्यटक भेटी देत नसल्याचे म्हटले आहे.
खरोसा लेणी आपण पाहिली आहे का, असाही प्रश्न सर्वेक्षणात विचारला होता. त्यात ६२ टक्के लोकांनी होय म्हटले आहे. तर ३८ टक्के लोकांनी ‘नाही’ या पर्यायावर टीकमार्क केली आहे.
आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना पर्यटकांच्या ठिकाणी भेट देण्यासाठी नेले आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात ४० टक्के लोकांनी ‘होय’ म्हटले असून, ६० टक्के लोकांनी ‘नाही’ असेच नमूद केले आहे.
या तिन्ही पर्यटनस्थळी सोयी-सुविधा उपलब्ध आहेत का, या प्रश्नावर ९ टक्के लोक ‘होय’ म्हणतात. तर ४० टक्के लोक ‘नाही’ म्हणतात. ५१ टक्के लोकांनी सोयी सुविधा काही प्रमाणात उपलब्ध असल्याचे मत नोंदविले आहे.
पर्यटनस्थळांच्या देखभाल दुरुस्तीकडे पुरातत्व खात्याचे लक्ष आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात केवळ ११ टक्के लोकांनी ‘होय’ म्हटले आहे. तर ६९ टक्के लोकांनी ‘नाही’चा शेरा दिला आहे. २० टक्के लोकांनी काही प्रमाणात पुरातत्व खात्याचे लक्ष असल्याचे नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
औसा तालुक्यातील ५० टक्के लोकांनी आत जाऊन हा किल्ला पाहिला नाही. फक्त किल्ल्याच्या तटबंदीचे दर्शन घेतले आहे. तर खरोसा येथे असलेल्या लेण्यांजवळील डोंगरावर रेणुकादेवीचे मंदिर आहे. नवरात्र महोत्सव व कोजागिरी पौर्णिमेला येथे यात्रा असते. त्यामुळे लेण्यांना ८० टक्के लोक भेटी देतात.
उदगीर हे ऐतिहासिक शहर आहे. उदयगिरी किल्ल्यामुळे उदगीर शहर प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर १७६० ला लढाई झाली होती. किल्ल्यामध्येच उदागीरबाबांचे मंदिर आहे. उदगीरचा हा भुईकोट किल्ला यादव काळातला. लढाईसाठी या किल्ल्याचा फायदा झाला. निजामाला उदगीरातच नमविले गेले. पण त्याला कायमचे वेसन घालण्यात कमी पडलो. या किल्ल्यातून एक भुयारी मार्ग बीदरच्या किल्ल्यापर्यंत जातो. हा मार्ग अंदाजे ६० ते ७० कि.मी. लांब आहे.
४लातूर जिल्ह्याचा उदगीर एक तालुका. हे शहर उदयगिरी किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे. शिक्षणाच्या बाबतीतही पुढारलेले शहर असले तरी ऐतिहासिक ठेव्यामुळे या शहराची ख्याती सर्वदूर आहे. उदगीरचा भुईकोट किल्ला यादव काळातला. त्याचा लढाईसाठी फायदा झाला. निजामाला उदगीरातच नमविले असल्याचा संदर्भ आहे.
औसा येथील भुईकोट किल्ला १४६० ते १४८० च्या सुमारास बांधण्यात आला. या किल्ल्यामध्ये लढाई झाली नसल्याचे सांगण्यात येते. परंतु, इथे अनेक राजे-महाराजे, सरदार राहिले असल्याचा उल्लेख दस्तावेजात आहे. ५ हेक्टर ५३ आर क्षेत्र परिसर या किल्ल्याचा आहे. चोहोबाजूंनी दुहेरी तटबंदी व १२० फुट रुंदीचा खंदक, अनेक महाल, भुयारी मार्ग असणारा हा किल्ला आहे.

औसा व खरोसा येथील काही लोकांशी सर्वेक्षणाव्यतिरिक्त संवाद साधला. त्यातील बऱ्याच जणांनी किल्ल्याला व लेण्यांना भेटी दिल्या नसल्याचे सांगितले. शिवाय, पुरातत्व खात्याकडून देखभाल व दुरुस्ती होत नसल्याची नाराजी व्यक्त केली. पर्यटकांसाठी तेथे सोय नसल्याने भेटी देण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे पर्यटनस्थळाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करून पर्यटकांना आकर्षित करण्याची गरज असल्याची मागणीही औसा व खरोसा येथील नागरिकांनी केली.

Web Title: Not only 'archeology'; Locals read!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.