मुंबई नव्हे, छत्रपती संभाजीनगरचे भारी; शासकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’ला १९३ प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:00 IST2025-10-07T16:59:53+5:302025-10-07T17:00:02+5:30
राज्य कोट्यातील तिसरी फेरी १० ऑक्टोबरपासून होणार असून, प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांना १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान मुदत आहे.

मुंबई नव्हे, छत्रपती संभाजीनगरचे भारी; शासकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’ला १९३ प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दुसऱ्या फेरीअखेर एकूण १९३ विद्यार्थ्यांनी ‘एमबीबीएस’ला प्रवेश घेतला आहे. त्यापैकी १०४ विद्यार्थ्यांनी ‘रिटेंशन’ भरले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या फेरीत मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या काही विद्यार्थ्यांनी घाटीतील सोयीसुविधा लक्षात घेऊन दुसऱ्या फेरीत छत्रपती संभाजीनगरला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) नव्याने प्रवेशित एमबीबीएस विद्यार्थ्यांचा अधिष्ठाता संवाद (डिन्स ॲड्रेस) मंगळवारी सकाळी ११:०० वाजता बजाज संकुलात होणार आहे. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे हे नव्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, ‘आयएमए’ अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर आणि सचिव डाॅ. योगेश लक्कस उपस्थित राहणार आहेत.
तिसरी फेरी बाकी
राज्य कोट्यातील तिसरी फेरी १० ऑक्टोबरपासून होणार असून, प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांना १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान मुदत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शरीररचना विभागाकडून करण्यात आले आहे. यावेळी सर्व विभागप्रमुखांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.
सहा वसतिगृहांची मागणी
डाॅ. शिवाजी सुक्रे म्हणाले, घाटीतील सुविधा लक्षात घेऊन मुंबईत प्रवेश झालेल्या काही विद्यार्थ्यांनी नंतर आपल्याकडे प्रवेश घेतला आहे. वाढती विद्यार्थीसंख्या लक्षात घेऊन पदव्युत्तर, पदवीपूर्व, नर्सिंग, बीपीएमटी आणि नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी एकूण सहा वसतिगृहांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. या सहा वसतिगृहांची एकत्रित प्रवेश क्षमता २,१०० असणार आहे.