छत्रपती संभाजीनगर: राज्य शासनाच्या 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजने'मध्ये आता क्रांतीकारी बदल होण्याची शक्यता आहे. केवळ तमाशा, गायन किंवा साहित्य क्षेत्रातील व्यक्तींनाच कलावंत न मानता सुतार, लोहार, मूर्तिकार आणि चित्रकार यांसारख्या पारंपरिक कौशल्यधारकांनाही 'कलावंत' म्हणून मान्यता द्यावी, अशी महत्त्वाची शिफारस निवड समितीने शासनाकडे केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील हजारो कारागिरांना मोठा आधार मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या निवड समितीच्या बैठकीत कलावंतांच्या व्याख्येचा विस्तार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. पारंपरिक कारागिरांनाही या योजनेत सामावून घेऊन त्यांच्या कलेला न्याय मिळावा, अशी आग्रही भूमिका समितीने घेतली आहे.
निवडीचे उद्दिष्ट १०० वरून ५०० करण्याची मागणी
सध्या या योजनेअंतर्गत दरवर्षी केवळ १०० कलावंतांची निवड केली जाते. मात्र, प्रस्तावांची वाढती संख्या पाहता हे उद्दिष्ट अपुरे असल्याचे समितीने नमूद केले आहे. दरवर्षी किमान ५०० कलावंतांची निवड करावी आणि पात्र असूनही संधी न मिळालेल्यांसाठी 'प्रतीक्षा यादी' तयार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी समितीने पत्राद्वारे शासनाकडे केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली निवड प्रक्रिया आता नवीन समिती अस्तित्वात आल्याने वेगाने सुरू झाली आहे.
मानधनात दुप्पट वाढ; अर्जांसाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत
वृद्धापकाळात कलावंतांची होणारी परवड थांबवण्यासाठी शासनाने या मानधनात मोठी वाढ केली आहे. पूर्वी अडीच हजार रुपये मिळणारे मानधन आता दरमहा ५ हजार रुपये करण्यात आले आहे. सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांसाठी प्राप्त झालेल्या सुमारे २७०० हून अधिक प्रस्तावांची छाननी सध्या सुरू आहे. ज्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत, त्या दुरुस्त करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी दिली आहे.
योजनेसाठीच्या प्रमुख अटी आणि नियम
या सन्मान योजनेसाठी अर्जदार किमान १५ वर्षे कलावंत असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांच्या आत, वय किमान ५० वर्षे (दिव्यांगांसाठी ४० वर्षे) असणे अनिवार्य आहे. निवड झालेल्या कलावंतांना त्यांच्या कलेचे सादरीकरण करावे लागणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती आता अर्जांच्या अंतिम निवडीवर शिक्कामोर्तब करणार असून पात्र कलावंतांना लवकरच वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे.
Web Summary : Maharashtra's artist pension scheme may include artisans like carpenters and blacksmiths. The selection committee suggests expanding the definition of 'artist', increasing the annual selection target to 500, doubling the allowance to ₹5000, and extending the application deadline to April 15.
Web Summary : महाराष्ट्र की कलाकार पेंशन योजना में अब बढ़ई और लोहार जैसे कारीगर भी शामिल हो सकते हैं। चयन समिति ने 'कलाकार' की परिभाषा का विस्तार करने, वार्षिक चयन लक्ष्य को 500 तक बढ़ाने, भत्ते को दोगुना कर ₹5000 करने और आवेदन की अंतिम तिथि 15 अप्रैल तक बढ़ाने का सुझाव दिया है।