फॅमिली हिस्ट्री नाही, मग कॅन्सर का झाला? आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:07 IST2025-11-07T17:07:08+5:302025-11-07T17:07:40+5:30
‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस: साधारणपणे, फक्त ५ ते १० टक्के कॅन्सर केसेस अनुवंशिक असतात.

फॅमिली हिस्ट्री नाही, मग कॅन्सर का झाला? आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
छत्रपती संभाजीनगर : ‘डाॅक्टर साहेब, माझ्या घरात कधी कुणालाही कॅन्सर झाला नाही, मग मला कसा झाला,’ असा प्रश्न प्रत्येक कॅन्सर रुग्ण विचारतो. कारण कुटुंबात कॅन्सरचा इतिहास नसतानाही दरवर्षी अनेकांना विविध प्रकारचे कॅन्सर निदान होत आहे. चुकीची जीवनशैली, प्रदूषण, चुकीचा आहार यासह अनेक बाबी यासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे पुरेसे लक्ष देणे आवश्यक असल्याचे कॅन्सरतज्ज्ञांनी म्हटले.
भारतात दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस’ साजरा केला जातो. ज्याचा उद्देश कर्करोग प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचारांबद्दल जनजागृती करणे आहे. कुटुंबात (फॅमिली हिस्ट्री) कधी कुणाला कॅन्सर झालेला असेल तर इतर सदस्यांनाही थोडा अधिक धोका असतो, पण कॅन्सर होतोच असेही नाही. त्यामुळे चिंता करण्यापेक्षा आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
५ ते १० टक्के प्रमाण
साधारणपणे, फक्त ५ ते १० टक्के कॅन्सर केसेस अनुवंशिक असतात. दुसरीकडे कुटुंबात कोणताही इतिहास नसलेल्या लोकांमध्येही कॅन्सर आढळतो आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे जीवनशैली, वातावरण, इतर जोखीम घटक महत्त्वाचे ठरतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.
रोजची ओपीडी १५० ते २००
शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) दररोज ओपीडीत १५० ते २०० रुग्ण येतात, तर ‘आयपीडी’मध्ये २० ते २५ रुग्ण दाखल होतात.
कॅन्सरला घाबरू नका
कॅन्सरला घाबरून न जाता वेळीच धोक्याचे लक्षण ओळखावे. कॅन्सरवर आता अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत. व्यसनाला बळी पडू नये. आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा.
- डाॅ. अरविंद गायकवाड, विशेष कार्यअधिकारी, शासकीय कर्करोग रुग्णालय
प्रतिबंध महत्त्वाचा
फॅमिली हिस्ट्री नसतानाही कॅन्सर होत आहे, कारण यात पर्यावरण, जीवनशैली, संक्रमण आणि पेशींमधील नैसर्गिक बदल यांचा मोठा वाटा असतो; संतुलित आहार, व्यायाम आणि तंबाखू-मद्यापासून दूर राहणे हीच खरी प्रतिबंधक उपाययोजना आहे.
- डाॅ. अनुप तोष्णीवाल, कॅन्सरतज्ज्ञ
कॅन्सर पूर्ण बरा हाेतो
उपचार नाही, असा समज करून रुग्ण कॅन्सरला घाबरतात. परंतु वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे, उपचाराने कॅन्सर पूर्णपणे बरा होणे शक्य झाले आहे. फक्त लवकर निदान होणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीरावर कुठेही गाठ, बरी न होणारी जखम असेल तर वेळीच तपासणी करून घ्यावी.
- डाॅ. आय. जी. पटेल, कॅन्सरतज्ज्ञ