मनपा कर्मचार्यांचे पुन्हा पगार थकले
By Admin | Updated: May 29, 2014 00:20 IST2014-05-29T00:11:43+5:302014-05-29T00:20:40+5:30
परभणी : महानगरपालिकेच्या सफाई कामगार, कायम व रोजंदारी कामगारांचे पगार चार ते पाच महिन्यांपासून थकले आहेत.

मनपा कर्मचार्यांचे पुन्हा पगार थकले
परभणी : महानगरपालिकेच्या सफाई कामगार, कायम व रोजंदारी कामगारांचे पगार चार ते पाच महिन्यांपासून थकले आहेत. त्यामुळे कर्मचार्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मनपाने कर्मचार्यांचे पगार करावेत, अशी मागणी परभणी शहर महानगरपालिका सफाई संघटनेने केली आहे. संघटनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन पाठविले असून त्यात म्हटले आहे, कर्मचार्यांचे पगार झाले नसल्याने या कर्मचार्यांना दुसरीकडे काम करुन प्रपंच चालवावा लागत आहे. परंतु, एक दिवसही कामावर न गेल्यास निलंबनाच्या कारवाईसारखी नोटीस दिली जाते. तसेच एलआयसी हप्त्याचा भरणा देखील वेळेवर केला जात नाही. त्यामुळे कामगारांच्या पॉलिसीज लॅप्स होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पॉलिसी लॅप्स झाल्यास मनपा प्रशासन जबाबदार राहील. पगाराबरोबरच या कामगारांना इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात नगरसेवकांच्या नातेवाईकांकडून कर्मचार्यांना शिवीगाळ करणे, धमक्या देणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या नातेवाईकाचा हस्तक्षेप बंद करावा, पाच महिन्यांना थकित पगार द्यावा, एलआयसीचे कपात केलेली रक्कम खात्यावर भरणा करावी, लाड कमिटीच्या शिफारशीनुसार कर्मचार्यांच्या वारसांना तत्काळ नोकरीत सामावून घ्यावे, १२ वर्षांची पदोन्नती द्यावी, सफाई कामगारांचा संप काळातील पगार द्यावा, कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी महिन्यातून एक दिवस वेळ द्यावा, सफाई कामगारांना इतर पालिकांप्रमाणे एकवेळ काम द्यावे, आदी मागण्या आहेत. संघटनेच्या वतीने अध्यक्ष अनुसयाबाई जोगदंड, किरण गायकवाड, श्रावण कदम, के.के. भारसाखळे, पिराजी हत्तीअंबिरे, दत्ता खंदारे, पिराजी झिंझुर्डे, मोकिंद ढाले, सुभाष कांबळे, दत्ता गवाले, चांदू आराटे, दिलीप चौरंगे यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे. (प्रतिनिधी)