रात्र धावपळ, अफवा, हुरहुर अन् जागरणाची...!
By Admin | Updated: October 15, 2014 00:47 IST2014-10-15T00:39:36+5:302014-10-15T00:47:38+5:30
औरंगाबाद : प्रचाराच्या तोफा १३ आॅक्टोबर रोजी थंडावल्यानंतर १४ आॅक्टोबर रोजी रात्रभर सर्वच उमेदवारांची रात्र जागरणातच गेली.

रात्र धावपळ, अफवा, हुरहुर अन् जागरणाची...!
औरंगाबाद : प्रचाराच्या तोफा १३ आॅक्टोबर रोजी थंडावल्यानंतर १४ आॅक्टोबर रोजी रात्रभर सर्वच उमेदवारांची रात्र जागरणातच गेली. पोलिसांच्या गस्त, कार्यकर्त्यांच्या विरोधकांच्या हालचालींवर असलेला कटाक्ष आणि उमेदवारांची वेगवेगळ्या अफवांमुळे पूर्ती गाळण उडाली होती. निवडणूक विभागाच्या भरारी पथकानेदेखील उमेदवारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. असे असतानाही रात्रीतून झालेल्या उलथा- पालथी काही थांबल्या नाहीत. प्रचाराचा गोंगाट थांबल्यानंतर उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला. काही उमेदवारांना महाराजांचे आशीर्वाद, धार्मिक स्थळांचे दर्शन घेतले. अनेक समाजांनी पाठिंब्याचे पत्रही उमेदवारांना दिले. सर्व उमेदवारांची कार्यालये गर्दीने भरगच्च झालेली होती.
यंत्रणेसाठी गर्दीच गर्दी
पोलचिट, बुथ एजंट, मतदार ने-आण करण्यासाठी लागणारी वाहन यंत्रणा, मतदान करून घेतल्यानंतर कार्यकर्त्यांसाठी दुपार व रात्रीची व्यवस्था यावर गटागटाने आखणी सुरू होती. फोडाफोडी, बैठका आणि धावपळीच्या वातावरणात आजचा दिवस संपला, तर रात्रदेखील याच धामधुमीत गेली. उद्या १५ रोजी सकाळीच मतदानाला सुरुवात होणार आहे.
पोलचिट (मतदान पावती) मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणेसह उमेदवारांची यंत्रणाही राबली. पोलचिटचे गठ्ठे, मतदार याद्या, सॉफ्टवेअर डाऊनलोडिंगसाठी उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांत गर्दी होती.
तोफा थंडावल्या; पाठिंब्याची रीघ
प्रचाराच्या तोफा थंडावल्या, तरी पाठिंबा देण्यासाठी अनेकांची रीघ पक्ष कार्यालयांमध्ये होती. प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी मागणी पूर्ण करण्याच्या आश्वासनावर पाठिंबा देत होते. पाठिंब्याची ही खैरात धोरणांमुळे सुरू होती की, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा घसा ओला केल्यामुळे सुरू होती. यावरून उमेदवारांच्या कार्यालयात खुमासदार चर्चा सुरू होती. काही उमेदवारांचे कार्यकर्ते स्पर्धक उमेदवाराच्या प्रचार कार्यालयामधून मोबाईलवरून एसएमएस पाठवून मतदान यंत्रणेची माहिती देत होते.