'औरंगाबाद-पैठण' रस्त्याच्या कामास मार्च-एप्रिलमध्ये होणार सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 17:43 IST2020-10-17T17:41:57+5:302020-10-17T17:43:50+5:30
पैठण-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टचे काम अंतीम टप्प्यात आले आहे.

'औरंगाबाद-पैठण' रस्त्याच्या कामास मार्च-एप्रिलमध्ये होणार सुरुवात
पैठण : निधी अभावी बऱ्याच वर्षांपासून रखडलेला 'औरंगाबाद-पैठण' रस्ता राज्य सरकारकडून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे ( एनएचए ) वर्ग करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून रस्त्याच्या कामास निधीची कमतरता पडणार नाही, असे आश्वासन देत पैठण-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ मार्च ते एप्रिल दरम्यान होईल असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
पैठण-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. गेल्या १२ वर्षापासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे. राज्य सरकार कडून काम होत नसल्याने शेवटी सदर रस्ता केंद्राच्या ७५२ - ई अंतर्गत भारतमाला योजनेत वर्ग करण्याची शिफारस जेष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपण केली होती. राज्याकडून केंद्र सरकारकडे हा रस्ता वर्ग करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानेच रस्त्याच्या डिपीआर चे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी जवळपास २००० कोटी खर्च येणार असून पैठण-औरंगाबादसह डीएमआयसी बिडकीन व शेंद्रा या भागाची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे असेही मंत्री दानवे यांनी सांगितले.
कोणाच्या ओरडण्याने पहाट होत नाही
केंद्राच्या रस्ता कामाचे श्रेय पैठण तालुक्यातील एक पुढारी घेत असल्याचे काही कार्यकर्त्यांनी मंत्री दानवे यांच्या लक्षात आणून दिले. यावर दानवे यांनी, 'कोणाच्या ओरडण्याने पहाट होती या पेक्षा पहाट होती याला महत्त्व आहे. या अगोदर औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण झाले नाही, जनतेला सगळे कळते.' अशा चिरपरिचित शैलीत समाचार घेतला.