पुढचा आठवडा महत्वाचा; महापालिका ॲक्शन मोडमध्ये, शहरातील प्रत्येक घर कोविड सेंटर समजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 19:23 IST2022-01-11T19:23:04+5:302022-01-11T19:23:30+5:30
Corona Virus: ९० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहतील, ज्या रुग्णाला किंचितही त्रास होत असेल तर त्याला त्वरित रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पुढचा आठवडा महत्वाचा; महापालिका ॲक्शन मोडमध्ये, शहरातील प्रत्येक घर कोविड सेंटर समजणार
औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे बहुतांश बाधित रुग्ण घरातच राहतील. महापालिका प्रशासन प्रत्येक रुग्णावर लक्ष ठेवणार आहे, त्यासाठी वाॅररूम तयार करण्यात येत असल्याची माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.
रविवारपर्यंत शहरात ४४८ बाधित रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. प्रत्येक रुग्ण पाच ते आठ दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. तातडीच्या सेवेसाठी रुग्णांना किमान सहा मोबाइल नंबर दिले जातील. वाॅररूममधील ऑपरेटर आणि तज्ज्ञ डॉक्टर दिवसभरातून दोन वेळेस संबंधित रुग्णांशी संपर्क साधून चर्चा करतील. स्मार्ट सिटीच्या इमारतीमधून वाॅररूम काम करणार आहे. गरज पडल्यास काही रुग्णांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मदत केली जाईल. ज्या रुग्णाला किंचितही त्रास होत असेल तर त्याला त्वरित रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ‘एमएचएमएच’ आठ दिवसांमध्ये अपडेट करून नागरिकांच्या सेवेत देण्यात येईल. या ॲपमुळे बाधित रुग्णांना शहरात कोणत्या ठिकाणी बेड रिकामे आहेत, त्याची माहिती मिळेल, असेही पाण्डेय यांनी सांगितले.
पुढचे सात दिवस महत्त्वाचे
आज ज्या पद्धतीने रुग्णवाढ होत आहे, ते पाहता पुढील पाच ते सात दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. दररोज दोन हजार रुग्ण बाधित आढळून येतात का, याकडे प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. महापालिकेकडे स्वतःच्या ५७५ ऑक्सिजन खाटा तयार आहेत. मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये साडेतीनशे रुग्ण झाल्यानंतर पुढील केंद्र सुरू करण्यात येतील. महापालिकेला संपूर्ण औषधी जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत मिळणार आहे.
महापालिकेचा १५ कलमी कार्यक्रम
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत महापालिकेने पंधरा कलमी कार्यक्रम निश्चित केला आहे. बूस्टर डोस, बाधित रुग्णांवर लक्ष ठेवणे, गरजेनुसार कोविड सेंटर वाढविणे, कर्मचारी संख्या वाढविण्याची तयारी, आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन दिवस घाटीत प्रशिक्षण, ऑक्सिजन टँक, सिलिंडर भरून ठेवणे, ॲम्ब्युलन्स तयार ठेवणे, बाधित रुग्णांना समुपदेशन, होम आयसोलेशनसाठी खासगी रुग्णालयांनी पॅकेज तयार करावे, बाधित रुग्णाला पाच दिवसांतून एकदा तरी मनपा कर्मचाऱ्यांनी तपासणे, मनपा अधिकारी, कर्मचारी यांना संसर्ग होऊ नये, याची काळजी घेणे.