तीन राज्यांतून नवीन गव्हाची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 01:05 IST2016-04-07T00:58:59+5:302016-04-07T01:05:39+5:30

औरंगाबाद : मध्यप्रदेशपाठोपाठ राजस्थान व गुजरात राज्यांतील नवीन गहू स्थानिक बाजारात दाखल झाला आहे. मागील हंगामापेक्षा यंदा गव्हाची गुणवत्ता चांगली असल्याचे दिसून आले.

New wheat arrivals from three states | तीन राज्यांतून नवीन गव्हाची आवक

तीन राज्यांतून नवीन गव्हाची आवक

औरंगाबाद : मध्यप्रदेशपाठोपाठ राजस्थान व गुजरात राज्यांतील नवीन गहू स्थानिक बाजारात दाखल झाला आहे. मागील हंगामापेक्षा यंदा गव्हाची गुणवत्ता चांगली असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अवकाळी पावसाचा फटका न बसल्याने गव्हाळ रंगदार गहू बाजारात पाहण्यास मिळत आहे. वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी बाजारात पाऊल ठेवल्याने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाजारात नवीन गहू, ज्वारी, तांदूळ, डाळींच्या सर्व व्हरायटी विक्रीला आल्या आहेत. आता वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्यांनीही धान्य खरेदीसाठी मोंढ्यात व जाधववाडीत गर्दी करणे सुरूकेले आहे. मागील आठवडाभरात तीन राज्यांतून मिळून सुमारे १८०० ते २ हजार टन गव्हाची आवक झाली.
मागील हंगामात ऐन काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊस झाल्याने गव्हाची प्रत खराब झाली होती. दाण्याचा रंग फिका पडला होता. गव्हाचे व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, यंदा दुष्काळामुळे गव्हाचे उत्पादन १२ ते १५ टक्क्यांनी कमी झाले आहे.
यंदा अवकाळी पाऊस पडला पण मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांनी आधीच गहू काढून ठेवल्याने या पावसाचा परिणाम जाणवला नाही. सध्या मध्यप्रदेशातून गव्हाळ रंगदार गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत गहू क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांनी महागला आहे. मध्यप्रदेशातील लोकवन गहू १८७५ ते २१५० रुपये, बन्सी गहू २१०० ते २२५० रुपये, मिनी शरबती २००० ते २२०० रुपये, तर शरबती गहू २२५० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. राजस्थानचा शरबती गहू २०५० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल विकल्या जात आहे. गुजरातचा तुकडी गहू २००० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. दरवर्षी राजस्थान व गुजरातहून येणारा नर्मदा गहू येथे आणून विकणे परवडत नसल्याने व्यापाऱ्यांनी तो गहू मागविला नाही.
ज्वारी व बाजरीची आवक अचानक कमी झाल्याने क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारी २१०० ते २६५० रुपये क्विंटल विक्री होत आहे. ज्वारीला मागणी कमीच आहे. जिथे २० क्विंटल गहू विकला जातो तेव्हा १ क्विंटल ज्वारी विकल्या जात आहे. खारुड्यासाठी बाजरीला मागणी वाढली आहे. परिणामी बाजरी १८०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल विकली जात आहे.

Web Title: New wheat arrivals from three states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.