अनेकांना घ्यावा लागणार नव्या वॉर्डांचा शोध
By Admin | Updated: July 3, 2016 00:26 IST2016-07-03T00:11:19+5:302016-07-03T00:26:48+5:30
कळंब : कळंब न.प.च्या प्रभागातील १७ जागांसाठीची आरक्षण सोडत न.प. सभागृहात काढण्यात आली. १७ पैकी ९ जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या.

अनेकांना घ्यावा लागणार नव्या वॉर्डांचा शोध
कळंब : कळंब न.प.च्या प्रभागातील १७ जागांसाठीची आरक्षण सोडत न.प. सभागृहात काढण्यात आली. १७ पैकी ९ जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या. सर्वसाधारण प्रवर्गातील ८ पैकी ४ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. या रचनेमुळे अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.
कळंब न.प. सभागृहात उपजिल्हाधिकारी अभय मोहिते, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. मागच्या वेळेपेक्षा यंदा सर्वसाधारण गटातील दोन जागा कमी झाल्या आहेत. १ जागा अनुसूचित जातीसाठी तर १ जागा अनुसूचित जमातीसाठी वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुकांसाठी आता आठ जागांवरच स्वत:ची ताकद आजमावी लागणार आहे.
या प्रभागरचनेने मागील वेळेपेक्षा मोठा फेरबदल झाला आहे. शहरातील अनेक दिग्गजांचे हक्काचे मतांचे ‘पॉकेट’ या फेरबदलामध्ये उडाले आहेत. त्यामुळे या मतांवर निवडणूक जिंकण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांना आता नवीन मतदारांना जुळवून घ्यावे लागणार आहे. या रचनेमध्ये माजी नगराध्यक्ष किरण हौसलमल, शिवाजी कापसे, संजय मुंदडा, पांडुरंग कुंभार, गीता पुरी, बाळू बागरेचा, श्रीधर भवर यांची गैरसोय झाली आहे. विद्यमान उपनगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, आतिया शेख, वनमाला वाघमारे यांना या रचनेत सोयीस्कर प्रभाग झाले आहेत. या रचनेमुळे संजय मुंदडा यांना प्रभाग क्र. ३, मुताक कुरेशी यांना प्रभाग क्र. २, नगराध्यक्षा मीरा चोंदे यांना प्रभाग क्र. १, शिवाजी कापसे यांना प्रभाग क्र. ५, ६ किंवा ७ मधून नशीब आजमावे लागणार आहे. पांडुरंग कुंभार यांनाही या रचनेत हक्काचा प्रभाग गमवावा लागला आहे.
आगामी निवडणुकीत त्यांना प्रभाग क्र. ५ मधून सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागणार आहे. (वार्ताहर)