नवीन पायंडा! छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांचे बस्तान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 16:24 IST2025-05-15T16:23:53+5:302025-05-15T16:24:17+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात स्थायी स्वरूपाचे दालन पालकमंत्र्यांना देणे नियमबाह्य ठरू शकते.

नवीन पायंडा! छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांचे बस्तान
छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. तळमजल्यावर ज्या ठिकाणी हायस्पीड रेल्वेचे दालन सुरू केले हाेते. त्या दालनात सरकारी कर्मचाऱ्यांसह पालकमंत्र्यांच्या चमूचे बस्तान असणार आहे. पालकमंत्र्यांकडे येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने त्या ठिकाणी निवेदने स्वीकारली जातील. या प्रशासकीय निर्णयामुळे नवीन पायंडा पडणार असल्याचे बोलले जातेय.
पालकमंत्री शिरसाट यांच्या निवासस्थानी कुणाला भेटणे शक्य होत नाही. तसेच कोकणवाडी कार्यालयात त्यांना दैनंदिन व्यस्ततेमुळे भेटता येत नाही. परिणामी, सामान्य नागरिकांना त्यांना भेटून निवेदन देता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्याशी, शासनाशी निगडित, प्रशासकीय अडचणींबाबत निवेदने स्वीकारण्यासाठी कार्यालयाचा नारळ फोडण्यात आला आहे.
मला बसण्यासाठी ते दालन नाही
जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी भेटले नाहीत तर त्यांच्याशी निगडित निवेदने देण्यासाठी ते दालन सुरू केले आहे. तेथे सगळी प्रशासकीय यंत्रणा असेल. आमचा त्यांच्याशी समन्वय असेल. जनतेसाठी ते दालन असून पालकमंत्र्यांना बसण्यासाठी नाही. मुख्यमंत्री सहायता निधीसह विविध योजनांच्या लाभासाठी नागरिकांनी केलेल्या अर्जाचा पाठपुरावा तेथून केला जाईल.
-संजय शिरसाट, पालकमंत्री
अटी व शर्तींवर...
काही अटी व शर्तींवर पालकमंत्र्यांशी निगडित निवेदनांसाठी दालनास जागा दिली आहे. तेथे कुठलाही राजकीय पत्रव्यवहार होणार नाही, अशी मुख्य अट जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेली आहे.
संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी
कायदेशीर तरतूद नाही
जिल्हाधिकारी कार्यालय हे प्रशासकीय अधिकाराचे कार्यक्षेत्र आहे. पालकमंत्री हे राजकीय पद आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थायी स्वरूपाचे दालन पालकमंत्र्यांना देणे नियमबाह्य ठरू शकते. पालकमंत्र्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दालन देण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, बैठकीसाठी तात्पुरते दालन वापरण्याची मुभा असते. पालकमंत्र्यांना कायमस्वरूपी दालन दिले गेले, तर त्याचा अर्थ प्रशासनावर राजकीय हस्तक्षेप वाढतो, असा होऊ शकतो.
यांच्या दालनांवरून वाद
माजी आ. बच्चू कडू यांनी येथील कडा कार्यालय आवारात संपर्क दालन सुरू केले होते. त्या दालनावरूनही वादंग घडले होते. खासदार, आमदार, किंवा पालकमंत्र्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कायमस्वरूपी दालन ठेवण्याची नियमित व्यवस्था नसल्याची टीका करीत अमरावतीच्या माजी खा. नवनीत राणा यांच्या विरोधात विरोधकांनी आंदोलन केले हाेते.