स्वच्छतेचा नवा पॅटर्न! देवगिरी किल्ल्यावर प्लास्टिक बॉटल नेयची तर २० रुपये डिपॉझिट ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 12:23 IST2022-03-07T12:18:44+5:302022-03-07T12:23:26+5:30
स्वच्छतेच्या स्तुत्य उपक्रमाचे काैतुक, गोवळकोंडा किल्ल्यातील स्वच्छतेचा पॅटर्न देवगिरी किल्ल्यावर

स्वच्छतेचा नवा पॅटर्न! देवगिरी किल्ल्यावर प्लास्टिक बॉटल नेयची तर २० रुपये डिपॉझिट ठेवा
औरंगाबाद : पर्यटकांनी देवगिरी किल्ल्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकू नयेत म्हणून गोवळकोंडा किल्ल्यावरच पॅटर्न भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने गेल्या वर्षभरापूर्वी सुरू केला. पर्यटकांजवळ पाण्याची बाटली असेल तर त्यांच्याकडून सुरक्षा ठेव म्हणून २० रुपये घेतले जातात. किल्ला पाहून आल्यावर बाटली दाखवून ते २० रुपये परत घेतले जातात. हा उपक्रम यशस्वी होत असून किल्ल्यावरच्या खंदकातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले. तर या उपक्रमाचे सोशल मीडियावर काैतुकही होत आहे.
पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्मारकांच्या नावे समाजमाध्यमांवर पुरातत्त्व विभागाला टीकेचे धनी व्हावे लागते. मात्र देवगिरी किल्ल्यातील पाण्याच्या डिस्पोजल बाटली पर्यटकांना सोबत नेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सुरक्षा ठेव योजनेचे सोशल मीडियाकर्मी काैतुक करत आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक डाॅ. मिलन कुमार चावले हे हैदराबाद येथे कार्यरत असताना त्यांनी गोवळकाेंडा किल्ल्यावर स्वच्छतेसाठी त्यांनी पर्यटकांनी स्वच्छता पाळण्यासाठी डिस्पोजेबल वस्तू सोबत बाळगण्यासाठी सुरक्षा ठेवीची योजना राबवली. कालांतराने पर्यटकांकडून त्याला प्रतिसाद मिळत गेल्याने किल्ल्याच्या परिसरात स्वच्छतेला मदत झाली. खंदकातील कचरा बाहेर काढण्यात खूप अडचणी येतात. राज्यभरात किल्ल्यांवर असा उपक्रम राबवण्याची मागणी होत आहे.
लेणी, शाही हमामकडे जाण्यासाठी रस्ता करणे सुरू
किल्ल्याच्या परिसरातील लेण्यांतील मलबा हटवण्यात येत असून शाही हमामकडे जाण्यासाठी रस्ता केला जात आहे. वयोवृद्ध पर्यटक ज्यांना दाैलताबाद येथे आल्यावर किल्ला चढणे शक्य होत नाही. त्यांनाही इथे या वास्तू बघता येतील. पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले.
कचरा कमी होण्यास मदत होईल
वर्षभरापूर्वी डाॅ. मिलन कुमार चावले औरंगाबाद मंडळात रुजू झाल्यावर त्यांना खंदकात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकलेल्या दिसल्या. हा कचरा बाहेर काढण्यात खूप अडचणी आल्याने त्यांनी गोवळकोंडा पॅटर्न दाैलताबादला १८ मार्च २०२१ रोजी सुरू केला. त्यामुळे खंदकातील कचरा कमी होण्यास मदत झाली आहे, असे एस. बी. रोहणकर यांनी सांगितले.