‘जीवनदायी’ने दिला नवा चेहरा
By Admin | Updated: July 28, 2014 00:56 IST2014-07-27T23:55:32+5:302014-07-28T00:56:09+5:30
लातूर : वेगवेगळ्या कारणांनी जळित झालेल्या रुग्णांना ‘जीवनदायी’चा आधार मिळाला आहे. जीवनदायीने या रुग्णांना नवा चेहराच दिला आहे.

‘जीवनदायी’ने दिला नवा चेहरा
लातूर : वेगवेगळ्या कारणांनी जळित झालेल्या रुग्णांना ‘जीवनदायी’चा आधार मिळाला आहे. जीवनदायीने या रुग्णांना नवा चेहराच दिला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वोपचार रुग्णालयाने गेल्या तीन महिन्यांपासून जळित रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी दोन शिबिरे घेतली असून, आतापर्यंत ६१ शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.
जळित झाल्यानंतर रुग्णांना महागड्या उपचाराला सामोरे जावे लागते. गोरगरीब रुग्ण तर खाजगी सेवा घेऊ नाही. परिणामी, जळित झाल्याने कृत्रिम व्यंग घेऊन त्याला जगावे लागते. परंतु, शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केल्याने आता या रुग्णांवरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून जळित रुग्णांसाठी खास उपचार शिबीर घेऊन ‘जीवनदायी’तून या रुग्णांना नवा चेहरा देण्यात सर्वोपचार यशस्वी झाले आहे. ६१ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.
महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ति डोणगावकर, डॉ. अविनाश येळीकर, डॉ. श्रीकांत गोरे, डॉ. अजित जगताप, प्रसिद्ध सर्जन डॉ.जी.एल. अनमोड यांच्या उपस्थितीत गेल्या शनिवारी ६ रुग्णांवर व रविवारी १३ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मागच्या शिबिरात ४० अशा एकूण ६१ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या योजनेत दीड लाखांपर्यंतचा उपचार मोफत करण्यात आला आहे. दीड लाखापर्यंतच या शस्त्रक्रिया झाल्या, अशी माहिती जीवनदायी योजनेचे समन्वयक डॉ. आनंद बारगले यांनी दिली. (प्रतिनिधी)