नगराध्यक्षपदासाठी हवाय नवा चेहरा

By Admin | Updated: July 6, 2016 23:54 IST2016-07-06T23:42:04+5:302016-07-06T23:54:45+5:30

गोविंद इंगळे , निलंगा दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता राहिलेल्या निलंगा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची चाचपणी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे

A new face for the post of city president | नगराध्यक्षपदासाठी हवाय नवा चेहरा

नगराध्यक्षपदासाठी हवाय नवा चेहरा


गोविंद इंगळे , निलंगा
दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता राहिलेल्या निलंगा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची चाचपणी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून होत असून, नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने चुरस पहायला मिळणार आहे.
नगराध्यक्षपदाचे आरक्षण, वॉर्डरचना झाल्यानंतर इच्छुकही कामाला लागले आहेत. पक्ष कार्यालयात वरिष्ठांच्या गाठीभेटींचेही प्रमाण वाढले आहे. १० प्रभागांसाठी २० उमेदवार द्यावे लागणार आहेत. विद्यमान आमदार संभाजीराव पाटील यांना गेल्या निवडणुकीत १९ पैकी फक्त ३ जागांवर विजय मिळविता आला होता. परिणामी, एकहाती सत्ता काँग्रेसकडे गेली. आता प्रभागरचनेचा मोठा फटकाही भाजपाला बसला आहे. त्यातच नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने भाजपाही उमेदवाराच्या शोधात आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची व दिग्गजांची गर्दी दिसत आहे. या दोन्ही मोठ्या पक्षांनी नवीन चेहरा देण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनाही उमेदवारांच्या तयारीत असून, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तिकीट न दिल्याने शिवसेनेत गेलेले लिंबनअप्पा रेशमे हेही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शर्यतीत आहेत. निलंगा शहरात मनसेचे अस्तित्व नगण्य असले तरी काही उमेदवार देण्याची तयारी त्यांची आहे. आम आदमी पार्टीच्याही हालचाली असल्याचे दिसते आहे.
जनतेतून थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत १९७४ ला निलंग्याचे दुसरे आमदार श्रीपतराव सोळुंके यांनी पालिकेवर वर्चस्व मिळविले होते. त्यांनी पुन्हा १९८१ ला आपले वर्चस्व कायम ठेवले. पण १९८५ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सत्ता निलंगा पालिकेवर आली. अ‍ॅड. विठ्ठलराव गायकवाड नगराध्यक्ष झाले. पुन्हा १९९१ ला काँग्रेस जिंकली आणि विजयकुमार पाटील नगराध्यक्ष झाले.
माजी आमदार कॉम्रेड माणिक जाधव यांच्या नेतृत्वाखाली १९९६ ची निवडणूक शेकापने लढविली आणि सत्ता स्थापन केली. त्यावेळी अ‍ॅड. वीरभद्र स्वामी नगराध्यक्ष झाले. मात्र त्यांची कारकीर्द वादग्रस्त झाल्याने एक वर्षानंतर सत्तांतर होऊन काँग्रेसचे बाबुराव नितनवरे नगराध्यक्ष झाले. २००१ च्या निवडणुकीत विद्यमान आमदार संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सत्ता स्थापन केली. मात्र आघाडीची सत्ता अडीच वर्षांतच संपली आणि पुन्हा काँग्रेसच्या राजेश्वरी नितनवरे नगराध्यक्षा झाल्या. २०११ च्या निवडणुकीतही काँग्रेसला स्पष्ट बहुमत आल्याने सुनीता चोपणे नगराध्यक्ष झाल्या. आता २६ व्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीचे पडघम वाजत असून, नवा चेहरा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न आहेत.
निलंगा पालिकेने आतापर्यंत २५ नगराध्यक्ष पाहिले आहेत. २६ व्या नगराध्यक्षांसाठी ही निवडणूक होत आहे. जनतेतून नगराध्यक्ष निवडीची ही तिसरी निवडणूक आहे. यापूर्वी १९७४, २००१ च्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड झाली होती. पालिकेवर पाचवेळा प्रशासक आले. चारवेळा विरोधी पक्षाची सत्ता राहिली असून, सर्वाधिक काळ काँग्रेसचा होता.
निलंगा नगरपालिकेला २५ नगराध्यक्ष मिळाले आहेत. मात्र आता होणारी निवडणूक ही २६ व्या नगराध्यक्ष पदासाठी असेल. १९७४ आणि २००१ च्या थेट नगराध्यक्ष निवडीनंतर आता तिसऱ्यांदा जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची संधी जनतेला मिळाली आहे.

Web Title: A new face for the post of city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.