विद्यार्थ्यांत नवा उत्साह, नवी उमेद
By Admin | Updated: June 17, 2014 00:38 IST2014-06-17T00:15:02+5:302014-06-17T00:38:07+5:30
परभणी- दीड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर १६ जून रोजी सकाळीच जिल्हाभरातील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या... तासिकांच्या घंटांचे टोल पुन्हा - पुन्हा खणखणू लागले...
विद्यार्थ्यांत नवा उत्साह, नवी उमेद
परभणी- दीड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर १६ जून रोजी सकाळीच जिल्हाभरातील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या... तासिकांच्या घंटांचे टोल पुन्हा - पुन्हा खणखणू लागले... राष्ट्रगीत, प्रार्थनांनी वातावरणातील प्रसन्नता आणि शिस्तीचे पाठ गिरवण्यास प्रारंभ झाला. जिल्ह्या-जिल्ह्यातील शाळांमधून नवा उत्साह आणि नवी उमेद घेऊन विद्यार्थी, त्यांच्या गुरुजनांनी आजपासून शैक्षणिक सत्राच्या नव्या परिपाठालाच प्रारंभ केला. शाळेच्या पहिल्या दिवशीचा हाच उत्साह वर्षभर टिकवून भावी पिढी घडविण्याचे कार्य घडावे, अशीच अपेक्षा पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे.
सोमवारी जिल्ह्यातील शैक्षणिक सत्र सुरू झाले. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि पालकांमध्ये उत्साह होता. जिल्हा प्रशासनानेही शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव उपक्रम राबवित साजरा केला. यानिमित्ताने शिक्षण क्षेत्रात आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा गेला.
एखाद्या सणाची तयारी करावी त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी केली. आठवडाभरापासून विद्यार्थ्यांची ही तयारी सुरू होती. शाळेच्या गणवेशाबरोबरच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांकडे आग्रह धरला. शैक्षणिक सत्रासाठी लागणारे सर्व साहित्यांसह सोमवारी सकाळी विद्यार्थी शाळेत दाखल झाले. सकाळी ६ वाजेपासूनच विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी तयारीला सुरूवात केली. सकाळी ७ नंतर विद्यार्थ्यांचे जत्थे शाळेकडे येत असल्याचे पहावयास मिळाले.
नवा वर्ग, नवे वर्ग शिक्षक आणि नवे मित्र यामुळे पहिल्या दिवशी सारे काही नवे नवे जाणवत होते. जुने मित्र- मैत्रिण भेटल्यानंतर जाणवणारा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
जि. प. च्या शिक्षण विभागाने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठपुस्तके वाटप करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. त्याअंतर्गत सर्व शाळांना पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. सोमवारी सकाळी शाळांमधून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. प्रार्थनेच्यावेळी मुख्याध्यापक व गुरुजनांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. काही शिक्षणप्रेमी नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सोमवारी बहुतांश शाळांमध्ये १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती होती. तर विद्यार्थ्यांची उपस्थिती ८० ते ९० टक्केपर्यंत राहिली.
विद्यार्थ्यांच्या उत्साहाबरोबरच शिक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. पहिल्याच दिवशी नव्या वर्गातील विद्यार्थ्यांची ओळख करुन घेणे, त्यांना अभ्यासक्रमाविषयी माहिती देणे, असे नियोजन दिवसभरात झाले. त्याच प्रमाणे अनेक शाळांनी शिक्षकांची बैठक घेऊन वर्षभरात करावयाच्या कामांचे नियोजन केले. तसेच तासिकांचे नियोजन व वेळापत्रकही ठरविण्यात आले. शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देत त्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने अनेक शाळांनी नियोजन केले आहे.
उत्साह आणि वर्षभराचा संकल्प घेऊन विद्यार्थ्यांनी आज मौजमस्तीत दिवस घालविला. सकाळ आणि दुपार या दोन्ही सत्रांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. ७५ ते ८० टक्के विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती शाळांकडून देण्यात आली.
शाळेचा
पहिला
दिवस
शहरात सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. आपल्या मित्रांसमवेत विद्यार्थी शाळेंच्या दिशेने जात असताना दिसून आले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांचा किलबिलाट एका वेगळ्याच विश्वात घेऊन जात होता.
विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यानंतर शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेली पुस्तके अनेक शाळांनी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वितरित केली.
नवा वर्ग नवे वर्गशिक्षक आणि नवीन मित्रांसमवेत विद्यार्थ्यांनी आजचा दिवस साजरा केला.
शिक्षकांनी देखील पहिल्याच दिवशी वर्षभराचे नियोजन करीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प आज केला.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने विविध शाळांमध्ये सोमवारी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षकमंडळी उपस्थित होती.
प्रवेशासाठी पालकांची धावपळ
शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असतो. परंतु, पालकांना मात्र पाल्याच्या प्रवेशाची चिंता असते. आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा प्रत्येक पालकाची असते आणि यातूनच आज दिवसभर शाळांमध्ये दाखला मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही शाळेत यावे लागले.
शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश देणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक शाळांमधील प्रवेश क्षमता अधीच संपलेली होती. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शाळांना शक्य नसल्याने पालकांना पाहिजे त्या शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश करता आला आहे. ठराविक शाळांमध्येच प्रवेश मिळावा, यासाठी मागील काही दिवसांपासून पालकमंडळी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत होते. ज्या शाळांमध्ये मोजक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होते, अशा शाळांनी विद्यार्थ्यांची नोंदणी करुन लकी ड्रॉ काढून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले.
त्यामुळे आज शाळा परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या गजबजीबरोबरच पालकांचीही वर्दळ दिसून आली. ज्या पालकांच्या पाल्याचा प्रवेश शाळेत निश्चित झाला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आज दिवसभर शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल करुन घेणे व इतर कामे शाळांमध्ये करण्यात आली. त्यामुळे आजचा दिवस विद्यार्थी, शिक्षकांसाठी उत्साहाचा ठरला असला तरी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी मात्र हा दिवस तणावपूर्णच राहिला.
चिमुकली पाऊले शाळेकडे़़़!
सेलू: उन्हाळयाच्या दीड महिन्याच्या सुट्टीत मौज-मजा केल्यानंतर चिमुकली पाऊले आज शाळेच्या प्रांगणाकडे वळली़ १६ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली त्यामुळे आज सकाळपासूनच शाळांचे परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेले होते.
पाठीवर दफ्तर, हातात डबा आणि मित्रांसोबत अनेक विद्यार्थ्यांनी आज शाळेची वाट धरली़ पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी अनेक शाळांनी विविध उपक्रम राबविले होते. शाळेचा पहिला दिवस असतानाही शहरात सर्वत्र विद्यार्थ्यांची व पालकांची रेलचेल शाळांच्या रस्त्यावर दिसत होती़ तब्बल दीड महिन्यानंतर विद्यार्थ्यांना ने आण करणारे अॅटो, बसेस आज विद्यार्थ्यांना घेवून शहराच्या रस्त्यावरून धावताना दिसत होत्या़ दीड महिना दुपारच्या वेळेस उन्हाच्या काहिलीमुळे व सुट्टयामुळे शाळेच्या रस्त्यावर सर्वत्र शांतता पाहण्यास मिळत होती़ मात्र शाळेच्या पहित्याच दिवशी बाजारपेठही फुलून निघाली. दफ्तर, वहया, पुस्तके, सॉक्स, बूट व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील पालक आले होते़ अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी स्वागत केले. शहरी भागातील पालक आपल्या पाल्यांना शाळेकडे आणातांना दिसली. परंतु, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम होती़ अनेक शाळांनी पहिल्याच दिवशी मोफ त पाठयपुस्तक व गणवेश वाटप केले़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्या वरील हस्य फुलताना दिसून येत होते़ (प्रतिनिधी)
शिक्षणाच्या पंढरीत प्रवेशासाठी गर्दी
शैक्षाणिक, सामाजिक व सांस्कृतिक दृष्या एक वेगळे वलय असलेले सेलू शहर आहे़ शिक्षणाची पंढरी म्हणून सेलूूची खरी ओळख आहे़ त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेरुन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी शहरात दाखल होत आहेत़ त्यामुळे सर्व शाळात प्रवेशांसाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी दिसत होती़ सेलू शहरात नूतन विद्यालय शिक्षण संस्था तसेच श्रीराम प्रतिष्ठाणचे विविध अभ्यासक्रमाचे जाळे आहे या दोन संस्था नावाजलेल्या आहेत़ या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची झुंबड असते़ शाळेच्या पहिल्याच दिवशी दर्जेदार शिक्षण संस्थामध्ये प्रवेशासाठी गर्दी झालेली दिसत होती़
प्रदीर्घ सुट्यानंतर शाळा गजबजल्या
परभणी: जवळपास दोन- अडीच महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्यानंतर आज सोमवारी जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे.
यावर्षी पाऊस लांबला असला तरी शाळा वेळेवर झाल्या असून पालकांची प्रवेशासाठी धावपळ सुरु झाली आहे. रविवारपासूनच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागताचा समारंभ घेण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा शिक्षण खात्याचा प्रयत्न असला तरी ते जिल्ह्यात शक्य झालेले दिसत नाही.
सध्या उन्हाचा कडाका कायम असल्याने खेडोपाडी शाळेत विद्यार्थ्यांची जेमतेम उपस्थिती जाणवली. अनेक शाळांवर पाण्याचा प्रश्न असल्यामुळे आज पहिल्याच दिवशी खिचडी शिजली नाही. अनेक गैरसोयींना तोंड देत शाळेचा विद्यार्थी, शिक्षक पहिल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत विद्यार्थी संख्या बऱ्यापैकी होती. शहरी शाळांमध्ये प्रवेशाची झुंबड उडालेली दिसली. दफ्तर, वह्या खरेदीसाठी बाजारात पालक व विद्यार्थ्यांची गर्दी सुरुच आहे.
यावर्षी दफ्तरांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. एकूणच शालेय साहित्य महागले असून पालकांच्या खिशाला परवडणारे राहिलेले नाही. काही विशिष्ट शाळांकडे पालकांचा कल असल्यामुळे त्याच शाळेमध्ये प्रवेशासाठी पालकांचा ओढा आहे. प्रवेशासाठी खुलेआम डोनेशन घेतले जात आहे. खाजगी शाळा विशेष करुन नव्याने निघालेल्या शाळांमधून पालकांची मोठ्या प्रमाणावर लुट होताना दिसत असली तरी शिक्षण विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. एकंदर शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार असून पुढे दोन दिवस निकालाचीच धामधूम सुरु राहणार आहे.
प्राथमिकस्तरावरील काही वर्गाचे अभ्यासक्रम बदलल्यामुळे मागील आठवडाभर प्रशिक्षण वर्ग सुरु होते. शाळा सुरु झाल्यामुळे मागील दोन महिने ओस पडलेल्या शालेय इमारतींना पुन्हा एकदा बहर आला आहे. खाजगी संस्थांनी शैक्षणिक वर्षाच्या नवनवीन उपक्रमांना पालकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.