नवे संकट! २६ कोटी भरा, अन्यथा शहराचे पाणी बंद! जायकवाडी पाटबंधारे विभागाची आक्रमक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 19:16 IST2022-02-17T19:15:07+5:302022-02-17T19:16:00+5:30
चालू आर्थिक वर्ष आणि थकबाकीचा आकडा २६ कोटी ३२ लाखांपर्यंत पोहोचला आहे.

नवे संकट! २६ कोटी भरा, अन्यथा शहराचे पाणी बंद! जायकवाडी पाटबंधारे विभागाची आक्रमक भूमिका
औरंगाबाद/ पैठण : जायकवाडी धरणातून दररोज १५० एमएलडी पाण्याचा उपसा मनपाकडून करण्यात येतो. या पाण्याच्या मोबदल्यात महापालिकेला जायकवाडी पाटबंधारे विभागाला रक्कम अदा करावी लागते. थकबाकी आणि चालू आर्थिक वर्षाची मागणी २६ कोटी ३२ लाख रुपयांपर्यंत पोहोचली. महापालिकेकडे वारंवार निधीची मागणी केली. प्रत्येक पत्राला केराची टोपली दाखविण्यात येते. त्यामुळे २१ फेब्रुवारीपासून शहराचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जायकवाडीच्या पाण्यावर औरंगाबाद शहराची तहान भागते. धरणाच्या पायथ्याशी पाण्याचा उपसा करणारी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे. दररोज १५० एमएलडी पाण्याची उचल करण्यात येते. या पाण्यापोटी जायकवाडी पाटबंधारे विभागाला शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार रक्कम अदा करावी लागते. दरवर्षी अडीच ते तीन कोटी रुपये एवढी रक्कम होते. महापालिका दरवर्षी ही रक्कम पूर्णपणे कधीच भरत नाही. दरवर्षी मार्चपूर्वी थोडी-फार रक्कम भरण्यात येते. दरवर्षी थकबाकी वाढत आहे. चालू आर्थिक वर्ष आणि थकबाकीचा आकडा २६ कोटी ३२ लाखांपर्यंत पोहोचला आहे. महापालिकेने रक्कम भरावी, अशी मागणी यापूर्वी अनेकदा करण्यात आली. मात्र, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे २१ फेब्रुवारीपासून शहराचा पाणीपुरवठा हळूहळू बंद करण्याचा, इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे.
असा होईल पाणीपुरवठा बंद:
२१ फेब्रुवारी - १२ वाजता- दोन तास पाणी बंद
२२ रोजी - १२ वाजता - चार तास पाणी बंद
२३ रोजी - १२ वाजता- सहा तास पाणी बंद
२४ रोजी - १२ वाजता- आठ तास पाणी बंद
२५ रोजी - १२ वाजता- पाण्याचा उपसा पूर्णपणे बंद