पशुखाद्य महागल्याने औरंगाबादमधील पशुपालकांसमोर नवे संकट; बोंडअळीचा असाही फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 13:44 IST2017-12-20T13:37:28+5:302017-12-20T13:44:44+5:30

एकीकडे दुधाच्या किमतीवरून ‘राजकारण’ ऊतू चालले असताना. दुसरीकडे  पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. 

A new crisis in the face of cattle feed in Aurangabad; Such a shock of the bollworm | पशुखाद्य महागल्याने औरंगाबादमधील पशुपालकांसमोर नवे संकट; बोंडअळीचा असाही फटका

पशुखाद्य महागल्याने औरंगाबादमधील पशुपालकांसमोर नवे संकट; बोंडअळीचा असाही फटका

ठळक मुद्देबोंडअळीमुळे सरकीच्या ढेप उत्पादनात घटसरकी ढेपची साठेबाजी होत असल्याचा आरोप व्यापार्‍यांनी फेटाळला

औरंगाबाद : एकीकडे दुधाच्या किमतीवरून ‘राजकारण’ ऊतू चालले असताना. दुसरीकडे  पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. यंदा कपाशीवर बोंडअळीने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे राज्यातील कपाशीचे उत्पादन घटले आहे. मागणीच्या तुलनेत सरकीचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी, सरकी ढेपचे भाव वधारले आहे. यामुळे शाळू ज्वारीचा चारा (कडबा), उसाची कुट्टीही महागली आहे. यामुळे पशुपालकांना जनावरांच्या खाद्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. व्यापार्‍यांच्या मते औरंगाबादेत दररोज ४० ते ५० टन ढेप विकल्या जाते. 

औरंगाबादच नव्हे तर जालना, नांदेड, परभणी आदी ठिकाणच्या आॅईल मिलमधून सरकी ढेपची शहरात आवक होते. राज्यात यंदा ४२ लाख हेक्टरवर बीटी कापसाची लागवड करण्यात आली होती. सरकारच्या आकडेवारीनुसार २० जिल्ह्यांत बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सुमारे ५ लाख शेतकर्‍यांनी नुकसानभरपाईसाठी सरकारकडे अर्ज केले आहे. बोंडअळीमुळे कपाशीचे उत्पादन घटले तसेच सरकीचेही उत्पादन घटले आहे. परिणामी, क्विंटलमागे २५० रुपयांनी सरकी ढेपचे भाव वधारले.

यासंदर्भात व्यापारी भरत कसबेकर यांंनी सांगितले की, १५ ते २० दिवसांपूर्वी सरकी ढेप १७०० ते १८०० रुपये क्विंटल विकली जात असे, आज १९५० ते २०५० रुपये क्विंटल विकली जात आहे. सरकी ढेप महागल्याने त्याचा परिणाम शाळू ज्वारीच्या चार्‍यावर (कडबा)वर झाला आहे. आता ज्वारीची पेरणी अंतिम टप्प्यात आल्याने चाराही कमी झाला आहे. यासंदर्भात कडबा विक्रेता शेख युनूस यांनी सांगितले की, १८०० ते २००० रुपये शेकडा विक्री होणारा कडबा आता २२०० ते २३०० रुपये विकत आहे. तसेच २००० रुपये टन विकली जाणारी उसाची कुट्टी आता २५०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. पशुखाद्य महागल्याने पशुपालकांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला आहे.  

सरकी ढेपच्या साठेबाजीने भाववाढ झाल्याचा आरोप 
आवक घटल्याने साठेबाजांनी सरकी ढेपचा साठा करून ठेवण्यास सुरुवात केल्याने भाववाढ झाल्याचे पशुपालक  हरीश पवार यांनी आरोप केला आहे; पण सरकी ढेपच्या व्यापार्‍यांचे म्हणणे आहे की, मागील वर्षी २२०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल भाव असताना काही व्यापार्‍यांनी सरकी ढेपचा साठा केला होता. नंतर मात्र, त्यांना १६०० ते १७०० रुपयांनी सरकी ढेप विकावी लागली. यामुळे साठा करणारे यंदा सावधतेने पाऊल उचलत आहेत. 

दररोज ६२० रुपयांचा खर्च वाढला
एका म्हशीला दररोज ६ कडब्याच्या पेंड्या व ७ किलो सरकी ढेप खाण्यास लागते. १५ दिवसांपूर्वी २०० रुपये खर्च येत आता २६२ रुपये खर्च येत आहे. माझ्याकडे १० म्हशी आहे. दररोज जास्तीचे ६२० रुपये खर्च करावे लागत आहे. सरकारने सरकी ढेपच्या साठेबाजीवर बंदी आणावी तरच सरकी ढेपचे भाव कमी होतील. 
- अर्जुन पवार, पशुपालक, सिडको साईनगर

Read in English

Web Title: A new crisis in the face of cattle feed in Aurangabad; Such a shock of the bollworm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.