पैशांसाठी तगादा लावल्याने चुलत्याची हत्या करणारा पुतण्या अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:48 IST2019-05-07T17:47:50+5:302019-05-07T17:48:51+5:30

आरोपीला पैठण येथून घेतले ताब्यात

nephew arrested in uncles murder case at Paithan | पैशांसाठी तगादा लावल्याने चुलत्याची हत्या करणारा पुतण्या अटकेत

पैशांसाठी तगादा लावल्याने चुलत्याची हत्या करणारा पुतण्या अटकेत

औरंगाबाद : चुलत्याची हत्या केल्यानंतर देवळाई चौकातून पसार झालेल्या आरोपीला पैठणमधील  लॉजमधून अटक करण्यात पुंडलिकनगर पोलिसांना सोमवारी सकाळी यश आले. बचत गटाच्या २५ हजार रुपयांसाठी मृत शेख सत्तार यांनी तगादा लावत शिवीगाळ केल्यामुळे आपण ही हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. 

शेख आलीम शेख बुढण (२२, रा. बायपास परिसर), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मृत शेख सत्तार शेख सांडू यांच्यावर देवळाई येथे सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याविषयी पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, पैशाच्या वादातून अलीमने चुलते सत्तार यांचा धारदार शस्त्राने भोसकून रविवारी सायंकाळी खून केला होता. या खुनानंतर अलीम  सिल्कमिल कॉलनीत गेला. तेथून त्याने त्याच्या साडूला फोन करून बोलावून घेतले आणि त्याच्या पत्नीला जालना येथे नेऊन सोडण्यास सांगितले. यानंतर अलीम चित्तेपिंपळगाव येथे गेला. तेथे त्याने दारू पिली आणि तेथून तो पैठणला गेला.

तेथील एका लॉजवर मुक्कामी थांबल्यानंतर सोमवारी सकाळी त्याने लॉजवरील कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून त्याच्या साडूच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्याच्याकडे ७०० रुपयेच शिल्लक आहेत. त्याला पैशाची आवश्यकता असल्याचे म्हणाला. मात्र, तेव्हा पोलिसांनी अलीमच्या साडूला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यामुळे अलीम पैठणमध्ये असल्याचे पोलिसांना समजले. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी पैठण येथील त्या लॉजवर जाऊन अलीमला ताब्यात घेतले. 

फिर्याद देण्यास नकार
रविवारी सायंकाळी खून झाल्यापासून ते आज सोमवारी ४ वाजेपर्यंत मृताचे नातेवाईक खुनाची फिर्याद पोलिसांकडे नोंदविण्यास नकार देत होते. मृत आणि आरोपी एकाच कुटुंबातील असल्याने आमचे आम्ही पाहून घेतो, असे नातेवाईक पोलिसांना म्हणत होते. पोलिसांनी मात्र याविषयी तक्रार द्यावीच लागते, असे स्पष्टपणे सांगितले. शेवटी मृताची पत्नी फिर्याद देण्यास तयार झाली.

२५ हजारांसाठी झाली हत्या
सत्तार यांच्या बचत गटाकडून अलीमने २५ हजार रुपये कर्ज घेतले होते. ही रक्कम अलीम बचत गटाकडे जमा करीत नव्हता. यामुळे सत्तार यांनी अलीमला फोन करून पैशासाठी शिवीगाळ केली. यामुळे चिडलेल्या अलीमने सत्तार यांना सायंकाळी देवळाई चौकात ये, तुला हिशोब देतो, असे अर्वाच्च भाषेत सांगितले. अलीम देवळाई चौकात चाकू घेऊन हजरच होता. तेथे सत्तार येताच अलीमने चाकूहल्ला करून त्यांचा खून केला. 

Web Title: nephew arrested in uncles murder case at Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.