शेजारधर्म पाळला की खैरेंना डिवचले ? सेना आमदार दानवेंनी भाजपाच्या कराडांना पेढा भरवून दिल्या शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 17:24 IST2020-03-16T17:20:43+5:302020-03-16T17:24:06+5:30
शुभेच्छा देऊन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळत त्यांना डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रविवारी दिवसभर रंगली.

शेजारधर्म पाळला की खैरेंना डिवचले ? सेना आमदार दानवेंनी भाजपाच्या कराडांना पेढा भरवून दिल्या शुभेच्छा
औरंगाबाद : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड निश्चित असल्याचे स्पष्ट होताच, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आ. अंबादास दानवे यांनी रविवारी त्यांना पेढा भरवून शुभेच्छा दिल्या.शिवसेना-भाजपतील राजकीय युद्धाचा विचार न करता त्यांनी शुभेच्छा देऊन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या जखमेवर मीठ चोळत त्यांना डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रविवारी दिवसभर रंगली.
शहरातील राजकीय वातावरण आणि मागील ३० वर्षांत पक्षासाठी दिलेल्या योगदानामुळे खैरेंना राज्यसभेवर संधी मिळण्याची खात्री होती. मात्र, पक्षाने प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिल्याने खैरे यांचा अपेक्षाभंग झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. भाजपने डॉ. कराड यांना संधी देऊन राजकीय डाव साधल्याचे मतही खैरेंनी व्यक्त केले होते. निराश झालेले खैरे दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ होते. सेनेने राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत महाविकास आघाडीचे सरकार बनविले. राजकीय खेळी करून भाजपकडून मुख्यमंत्रीपद हिसकावले. त्याचे पडसाद दोन्ही पक्षांत उमटल आहेत. असे असताना आ. दानवे हे कराड यांच्या घरी गेल्याने चर्चेला उधाण आले आहे.
दानवेंनी शेजारधर्म पाळला
दोन्ही पक्षातील राजकीय द्वंद्व जोरदारपणे सुरू असताना आ. दानवे यांनी हे सर्व विसरून शेजारधर्म पाळला. दानवे आणि कराड हे जुने शेजारी आहेत. दोघांच्या निवासस्थानामध्ये क्रांतीचौक ते पैठणगेट हा रस्ता आहे. रस्ता ओलांडून रविवारी दानवे यांनी कराड यांचे पेढा भरवून तोंड गोड केले. दानवेंनी शेजारधर्माच्या नावाखाली खैरेंच्या भावनांना डिवचण्यासाठी तर हा प्रकार केला नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.