स्ट्रेचर हवे? मग मोबाइल नाही, तर गाडीची चावी गहाण ठेवा; रुग्णाला उपचारात होतोय उशीर
By संतोष हिरेमठ | Updated: January 30, 2025 18:53 IST2025-01-30T18:51:33+5:302025-01-30T18:53:51+5:30
छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालय घाटी येथील धक्कादायक प्रकार; एकीकडे स्ट्रेचर नातेवाइकांनाच ढकलावे लागते. त्यात आता मोबाइल किंवा चावी ठेवूनच स्ट्रेचर देण्याचा प्रकार सुरू आहे.

स्ट्रेचर हवे? मग मोबाइल नाही, तर गाडीची चावी गहाण ठेवा; रुग्णाला उपचारात होतोय उशीर
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर हवी असेल, तर फक्त रुग्णाची अवस्था दाखवून भागत नाही. आधी तुमचा मोबाइल, दुचाकीची चावी किंवा घराची चावी एक प्रकारे गहाण ठेवावी लागेल, मगच स्ट्रेचर, व्हीलचेअर मिळेल. सरकारी रुग्णालयात मोफत सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा असते, पण घाटीच्या ओपीडीत, तर काही तरी वेगळेच सुरू आहे.
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी ही पद्धत मोठी डोकेदुखी ठरत आहे. ओपीडीत स्ट्रेचर आणि व्हीलचेअर उपलब्ध असल्या, तरी त्या सहजासहजी मिळत नाहीत. एकीकडे स्ट्रेचर नातेवाइकांनाच ढकलावे लागते. त्यात आता मोबाइल किंवा चावी ठेवूनच स्ट्रेचर देण्याचा प्रकार सुरू आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला आणताना नातेवाईक आधी मदतीसाठी धावतात, पण इथेच त्यांना अडवले जाते. आधी मोबाइल, अथवा गाडीची चावी ठेवा, मग स्ट्रेचर घेऊन जा, असे ओपीडीत सांगितले जाते. यामुळे अनेक वेळा रुग्णांच्या उपचारात विलंब होतो. ही पद्धत चुकीची असून, रुग्णालय प्रशासनाने त्वरित यावर उपाययोजना करायला हवी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत आहे.
मोबाइलच नसेल तर?
घाटीत बहुतांश गोरगरीब रुग्ण येतात. एखाद्या रुग्णाकडे, नातेवाइकाकडे मोबाइलच नसेल तर? मग त्याने स्ट्रेचर घ्यायचे नाही का? प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन हा प्रकार बंद करून स्ट्रेचर मिळवण्याची प्रक्रिया सोपी करायला हवी. यासाठी ओपीडीबाहेर पुरेसे स्ट्रेचर्स आणि व्हीलचेअर्स ठेवण्याची व्यवस्था करावी. स्ट्रेचर नेल्यानंतर परत ओपीडीत आणून ठेवण्याची सक्ती न करता त्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर सोपवणे गरजेचे आहे.
२० स्ट्रेचर
ओपीडीत २० स्ट्रेचर आणि एक व्हीलचेअर आहे, परंतु ते मिळविण्यासाठी नातेवाइकांना मोठा खटाटोप करावा लागतो.
हा प्रकार बंद करू
स्ट्रेचरसाठी मोबाइल, गाडीची चावी ठेवून घेण्याचा प्रकार कळला आहे. यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिली जाईल आणि हा प्रकार बंद केला जाईल. रुग्णांना सहजतेने स्ट्रेचर मिळतील.
- डाॅ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक