नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आणखी तिघे ताब्यात; औरंगाबादेत एटीएस व सीबीआयची संयुक्त कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 18:50 IST2018-08-21T18:37:36+5:302018-08-21T18:50:32+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आणखी तिघांना ताब्यात घेतले.

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आणखी तिघे ताब्यात; औरंगाबादेत एटीएस व सीबीआयची संयुक्त कारवाई
औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आणखी तिघांना ताब्यात घेतले. तसेच या कारवाईत पथकाने काही शस्त्रसाठा सुद्धा ताब्यात घेतला असल्याची माहिती आहे.
काल रात्रीपासून एटीएस आणि सीबीआय यांच्या संयुक्त पथकाची शहरात विविध ठिकाणी तपासणी सुरु होती. पहाटेच्या सुमारास या तपास यंत्रणांनी या आधी शहरातून पकडलेल्या सचिन अंदुरे याचा चुलत भाऊ आणि मित्रांच्या घरी छापा टाकला. त्यांनी देवळाई चौक ते देवळाई गाव या रस्त्यावरील मनजित प्राईड ग्लोरी या प्रकल्पातील दुसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या नचिकेत इंगळे, रोहित रेगे आणि अजिंक्य सुरळे यांना ताब्यात घेतले. नचिकेत हा शहरातील एमआयटी अभियांत्रिकीची विद्यार्थी असल्याचे त्याच्या फेसबुक प्रोफाईल मध्ये नमूद आहे. नचिकेतच्या घरातून पथकास कट्यार, तलवार आणि पिस्तूल आणि तीन जिवंत कार्तुस सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, नालासोपारा स्फोटकांचा तपास करत असताना तपास पथकाला संशयित शरद कळसकरचा जवळचा मित्र सचिन अंदुरेची माहिती मिळाली. त्या आधारे सचिनला अटक करण्यात आली आहे. सचिन औरंगाबादमध्ये एका दुकानात अकाऊंटंट म्हणून काम करत होता. सचिन अंदुरेनेच नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली, असा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे.