नंदिनी स्टार्सचा संघ बनला लोकमत एपीएल चॅम्पियन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 19:18 IST2025-02-10T19:17:05+5:302025-02-10T19:18:10+5:30
शिवम पाटील यांच्या नंदिनी स्टार्स संघाने ए. ए. पटेल प्रस्तुत लोकमत एपीएल क्रिकेट स्पर्धेत आदर्श अग्रवाल यांच्या सीएल कासा स्ट्रायकर्स संघावर मात केली

नंदिनी स्टार्सचा संघ बनला लोकमत एपीएल चॅम्पियन
छत्रपती संभाजीनगर : ओमकार बिरोटेच्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या बळावर शिवम पाटील यांच्या नंदिनी स्टार्स संघाने गुरुवारी झालेल्या ए. ए. पटेल प्रस्तुत लोकमत एपीएल क्रिकेट स्पर्धेत आदर्श अग्रवाल यांच्या सीएल कासा स्ट्रायकर्स संघावर ५ गडी राखून मात करीत चॅम्पियनचा बहुमान पटकावला.
विजयासाठी १७० धावांचे आव्हान नंदिनी स्टार्सने १४.५ षटकांत ५ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या ओमकार बिरोटे याने २५ चेंडूंत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय त्रिपुरेशसिंगने २० चेंडूंत ४ चौकार, एका षटकारासह ३५, ऋषिकेश नायरने १५ चेंडूंत ४ चौकारांसह २५ आणि अभिषेक पाठकने १५ चेंडूंत एक चौकार व ३ षटकारांसह २६ धावा फटकावल्या.
विजयासाठी पाठलाग करताना अभिषेक पाठकने संघाला अपेक्षित सुरुवात करून देताना मोहित जांगराच्या पहिल्याच षटकात १८ धावा संघाला मिळवून दिल्या. यात त्याने डोळ्यांचे पारणे फेडणारा कव्हर आणि लेगला अप्रतिम फ्लिकचा षटकार व लेटकटचा चौकार मारला. मात्र, आर्यन शेजूळने संघाला त्याच्या पहिल्याच षटकात यश मिळवून देताना अमित पाठकला कव्हरकरवी विकास नगरकरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्याने या षटकात फक्त २ धावा दिल्या. सीएल कासा स्ट्रायकर्सला तिसऱ्या षटकांत यश मिळू शकले असते. मात्र, थर्डमॅनला कठीण असा झेल ऋषिकेश तरडेला पकडता आला नाही. डावाचे चौथे षटकही नाट्यमय ठरले. या षटकात आर्यनच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक पाठकला यष्टिरक्षकाने जीवदान दिले. याच षटकात अभिषेकने बॅकवर्ड स्क्वेअरलेगला षटकार, तर ओंकार बिरोटेने खणखणीत कव्हर ड्राइव्ह मारत संघाला २४ चेंडूंत धावफलकावर ५० धावा लगावण्यात योगदान दिले. मात्र, बबलू पठाणने सीएल कासा स्ट्रायकर्सला सर्वांत मोठे यश मिळवून देताना या स्पर्धेत भन्नाट फार्मात असणाऱ्या अभिषेकला थर्डमॅनला करण जाधवच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. मात्र, त्यानंतर ओंकार बिरोटेने रौद्ररूप धारण करत सीएल कासा स्ट्रायकर्सच्या सर्वच गोलंदाजांवर प्रतिहल्ला करीत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.
त्याने प्रथम बबलू पठाणला लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्हचा खणखणीत षटकार खेचत संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. नंदिनी स्टार्सचे ३० चेंडूंत ६० धावा धावफलकावर होत्या. सागर मिश्राला मिडविकेटवर षटकार ठोकणाऱ्या ओंकारने सातवे षटक टाकण्यास आलेल्या बबलू पठाणचा विशेष समाचार घेतला. या षटकात ओंकारने बबलू पठाणच्या गोलंदाजीवर त्याला सलग चार चेंडूंत २ षटकार आणि २ चौकार ठोकत स्वत:चे १८ चेंडूंत ५ चौकार, ५ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. सागर मिश्रालाच कव्हरला षटकार ठाेकत ओंकारने ४४ चेंडूंत संघाला धावांचे शतक पूर्ण करून दिले. याच षटकात पुन्हा त्याने षटकार ठोकत संघाची धावगती उंचावत ठेवली. ओंकारने विकास नगरकरवरही हल्लाबोल करीत त्याला लाँगऑफवर षटकार ठोकला. अखेर विकास नगरकरने चतुराईने गोलंदाजी करत ओंकारला त्रिफळाबाद केल्यानंतर सीएल कासा स्ट्रायकर्सच्या मार्गातील प्रमुख अडथळा दूर केला. ओंकार बाद झाल्यानंतर त्रिपुरेशसिंगने १२ व्या षटकांत सय्यद जावेदला मिडविकेटला सणसणीत षटकार व चौकार, तर ऋषिकेश नायरने देखील कव्हरला चौकार मारत संघाला विजयासमीप नेले. १३ वे षटक टाकण्यास आलेल्या मोहित जांगर या वेगवान गोलंदाजाला चौकार मारला. मात्र, पुन्हा असाच फटका मारण्याच्या प्रयत्नात त्रिपुरेशसिंगचा उडालेला झेल साहिल तडवीने अप्रतिमरीत्या टिपला. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. १३ व्या षटकांत ऋषिकेश नायरने जांगराला पूलचा चौकार मारत विजयासाठीचे धावा व चेंडूंचे अंतर पूर्ण केले. ९ चेंडूंत ८ धावांची गरज असताना ऋषिकेश नायरने पुन्हा चौकार मारला. ६ चेंडूंत २ धावांची गरज असताना आर्यन शेजूळने षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी सीएल कासा स्ट्रायकर्सने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ६ बाद १६९ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून सागर मिश्राने ३८ चेंडूंत ६ चौकार, २ षटकारांसह सर्वाधिक ५९ धावा केल्या. आर्यन शेजूळने २३ चेंडूंत ४ चौकार, एका षटकारासह ४०, साहिल तडवीने १६ चेंडूंतच ५ चौकार, एका षटकारासह ३६ धावांचे योगदान दिले. नंदिनी स्टार्सकडून त्रिपुरेशसिंगने २, तर मोहमद इम्रान, ऋषिकेश नायर व अभिषेक पाठक यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
नंदिनी स्टार्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले. हा निर्णय सार्थकी ठरवताना अनुभवी मोहमद इम्रानने चेंडूच्या गतीत बदल करताना आखूड टप्प्याच्या चेंडूवर ऑनसाइडला खेळण्याच्या प्रयत्नात सलामीवीर विकास नगरकरचा त्यानेच झेल घेऊन बाद केले. त्यानंतर सागर मिश्रा आणि आर्यन शेजूळ यांनी सावध फलंदाजी करीत एकेरी व दुहेरी धावांवर भर देतानाच खराब चेंडूला सीमापार धाडले. या दोघांनी ४१ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी करीत संघाच्या मजबूत धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर सागर मिश्राने साहिल तडवीच्या साथीने तिसऱ्या गड्यासाठी ३५ चेंडूंत ७५ धावांची भागीदारी करीत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली..
संक्षिप्त धावफलक
सीएल कासा स्ट्रायकर्स : १५ षटकांत ६ बाद १६९. (सागर मिश्रा ५९, आर्यन शेजूळ ४०, साहिल तडवी ३६, मोहित जांगरा १४. त्रिपुरेशसिंग २/२१, मोहमद इम्रान १/२४, ऋषिकेश नायर १/२४, अभिषेक पाठक १/४५)
नंदिनी स्टार्स : १४.५ षटकांत ५ बाद १७३.
(ओमकार बिरोटे ७५, त्रिपुरेशसिंग ७५, अभिषेक पाठक २६, ऋषिकेश नायर २५, आर्यन शेजूळ २/२३, मोहित जांगरा १/४२, बबलू पठाण १//३२, विकास नगरकर १/२१़़)