नांदेड-पुणे रेल्वे आठवड्यातून पाच वेळा धावणार
By Admin | Updated: July 2, 2014 00:15 IST2014-07-02T00:07:17+5:302014-07-02T00:15:55+5:30
परभणी : नांदेड-पुणे रेल्वे सोमवार व बुधवार रोजी विशेष रेल्वे धावणार आहे.

नांदेड-पुणे रेल्वे आठवड्यातून पाच वेळा धावणार
परभणी : नांदेड-पुणे रेल्वे सोमवार व बुधवार रोजी विशेष रेल्वे धावणार आहे. यापूर्वी नांदेड-पुणे दर मंगळवार आणि रविवारी मनमाडमार्गे दर शुक्रवारी परळी-लातूर मार्गे अशी एकूण आठवड्यातून तीन वेळा धावत होती. परंतु आता ७ जुलैपासून आठवड्यातून पाच वेळा नांदेड-पुणे रेल्वे धावणार आहे.
७ जुलैपासून दर सोमवारी व बुधवारी परळी-लातूर मार्गे नांदेड येथून रात्री ९.१५ वाजता निघून परभणी येथे रात्री १०.३० वाजता आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी अनुक्रमे मंगळवार व गुरुवारी सकाळी ०९.१० वाजता पोहचणार आहे. तसेच परतीच्या वेळी पुणे येथून दर मंगळवार व गुरुवार रात्री १०.१० वाजता निघून बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ०८.१३ वाजता आणि नांदेड येथे १०.०० वाजता पोहोचणार आहे. वाढविण्यात येणाऱ्या रेल्वेला आॅगस्टपर्यंत विशेष रेल्वे म्हणून चालविण्यात येणार आहे. सप्टेंबरपासून सदर रेल्वेचा नवीन वेळापत्रकात समावेश आठवड्यातून पाच वेळा प्रमाणे नांदेड - पुणे रेल्वे कायमस्वरुपी धावणार आहे, अशी माहिती दिल्ली बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी कोचप्रबंधक श्रीकांत जनबंधू यांनी दिली. तसेच नांदेड-बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू करण्याचे आदेश दक्षिण मध्य रेल्वे विभागाला देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
नियोजित धरणे आंदोलन मागे
मुंबई-लातूर ऐवजी नांदेड-कुर्ला साप्ताहिक रेल्वे तसेच लातूर मार्गे नांदेड-पुणे एक्स्प्रेसच्या दोन दिवसांसाठीच्या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्यामुळे मुंबई येथील नियोजित धरणे आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. मुंबई-लातूर रेल्वेविषयी चर्चा करण्यासाठी रेल्वे बोर्डाचे अधिकारी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळाला पाचारण केले आहे. दिल्ली येथे चर्चा होणार आहे, अशी माहिती स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर वाईकर, अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, डॉ. राजगोपाल कालानी, सुरेश छत्रपती चंदूलाल बियाणी, सौंदळे गुरुजी, प्रवीण थानवी, श्रीकांत गडप्पा, दयानंद दीक्षित यांनी दिली.